ठाणे – तीव्र उन्हाळ्यामुळे येणाऱ्या नजीकच्या काळात जिल्ह्यात पाणीपुरवठा विषयी व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे त्यानुषंगाने पाणीटंचाई उपाययोजनासंबंधी यंत्रणांनी काटेकोर नियोजनाच्या तयारीला आतापासूनच लागा, असे निर्देश कठोर शब्दात ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शहापूर येथे आयोजित पाणी टंचाई उपाययोजना आढावा बैठकीत दिले.

यावेळी ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती छायादेवी शिसोदे, भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप,शहापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे,ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पंचायत समिती शहापूरचे उपअभियंता विकास जाधव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ कार्यकारी अभियंता तन्मय कांबळे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप कुलकर्णी, स्वच्छ भारत मिशनचे कार्यकारी अभियंता पंडित राठोड तसेच ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी,ग्रामसेवक, पाणीपुरवठा व जलसंपदा विभागातील अभियंता,उप अभियंता, पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून टँकरग्रस्त असलेल्या एकूण 91गाव-पाड्यातील पाणी पुरवठ्याबाबतची सद्य:स्थिती जिल्हाधिकारी यांनी जाणून घेतली आणि नजीकच्या काळात संभाव्य पाणीटंचाईचा सर्वतोपरी विचार करून त्यानुषंगाने आवश्यक उपाययोजना आतापासूनच सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शिनगारे यांनी दिले,ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या जगण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे. त्यामुळे कोणताही ग्रामस्थ पाण्यावाचून राहता नये. ज्या गावात पाणी पातळी कमी होऊन पाणी टंचाई आढळून येण्याची शक्यता आहे त्या गावपाड्यासाठी पंधरा दिवस आधी प्रस्ताव सादर करून एक दिवस आधीच टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात यावा. अशा सुचना त्यांनी दिल्या. शहापूर येथील भाऊली धरणाच्या सुरू असलेल्या कामाबाबतही त्यांनी आढावा घेतला आणि संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या की, त्यांनी रोजच्या रोज धरणाचे काम किती झाले याबाबत प्रगती अहवाल नियमित सादर करावा. या धरणाचे काम वेळेत पूर्ण करावे. त्याचबरोबर नजीकच्या काळात या उपाययोजना अंमलात आणण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मंजुरीसाठी तातडीने सादर करण्याविषयी त्यांनी सक्त सूचना दिल्या. पाणी नाही असे एकही गाव नसावे, यासाठी सर्व यंत्रणांनी पाणीटंचाईबाबत काटेकोर नियोजन करावे, गावातील लोकसंख्या, गावातील हातपंप संख्या,विहिरींची संख्या आणि पाण्याचे इतर पर्याय तपासून पुढील पंधरा दिवसांत शहापूर तालुक्यातील पाणीपुरवठा संदर्भात नियोजन करण्यात यावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी शिनगारे यांनी उपस्थित सर्व ग्रामसेवकांना दिल्या.पाण्याचे टँकर व इतर आवश्यक उपाययोजनांचे आतापासूनच व्यवस्थित नियोजन करावे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी सांगितले की, शहापूर तालुक्यात स्वच्छता प्रश्न महत्त्वाचा आहे. कचऱ्याची विल्हेवाट वेळोवेळी लावणे गरजेचे आहे. ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करण्यात यावे. तसेच कचरा उचलला गेल्यानंतरचे व उचलण्याआधीचे असे फोटो काढून फोटो संकलन करावे. तसेच ग्रामसेवकांनी ज्या ठिकाणी ग्रामस्थ किंवा इतर कोणी कचरा टाकत असेल तर त्या संबंधितावर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी असे आदेश दिले.शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शिसोदे यांनी दिले.ग्रामीण भागामध्ये पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी,पाणी टंचाई विषयी आवश्यक उपाययोजना राबविण्यासाठी जिल्हा परिषदेची पाणीपुरवठा यंत्रणा काटेकोरपणे नियोजन करेल असे आश्वासन त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.