भिवंडी (बी.एस.) भिवंडी तालुक्यातील कालवार येथील जिल्हा परिषद शाळेतील सातवीच्या वर्गाचे मंत्रिमंडळ आणि ईव्हीएम मशीनद्वारे निवडणूक घेण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवित भारताच्या लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया समजून घेतली. या प्रक्रियेचे पालकांकडून स्वागत करण्यात आले.
भिवंडी तालुक्यातील कालवार जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता सातवीचे वर्गशिक्षक अलंकार कान्हा वारघडे यांनी भारतीय संविधानाची निर्मिती हा पाठ शिकवताना वर्गाचे संविधान असावे, ही कल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडली. आपण आपल्या वर्गाचे “संविधान” तयार करू असे ठरले. त्यातील एक भाग म्हणजे वर्गाचे मंत्रिमंडळ तयार करणे. त्या निमित्ताने इयत्ता ७ वी च्या वर्गातील ४ पदांसाठी निवडणुका जाहीर केल्या. मुख्यमंत्री पदासाठी २अर्ज, अभ्यासमंत्री पदासाठी ३अर्ज,
आरोग्यमंत्री पदासाठी ५ अर्ज व सफाई मंत्री पदासाठी ३ अर्ज प्राप्त झाले. सर्व १३ उमेदवारांना अर्जात मागणी केल्याप्रमाणे निशाणी देण्यात आली. प्रचारासाठी उमेदवारांना वेळ देण्यात आली होती. विशेष म्हणजे उमेदवारांनी स्वतःच्या प्रचाराच्या घोषणा ही तयार केल्या होत्या. एकूण ४ पदांपैकी मुख्यमंत्री पदाची निवडणूक दिनांक १२ जुलै रोजी पार पडली. ह्या निवडणुकीसाठी अँड्रॉइड प्लॅटफॉर्म वरील ईव्हीएम मशीन वापरण्यात आली.
इयत्ता ६ वीच्या दक्ष सुनील म्हणेरे व मित शिरीष पाटील यांनी मतदान अधिकारी म्हणून काम पाहिले. विदयार्थी प्रथमच
ईव्हीएम वर मतदान करीत मुलांनी मतदानाचा आनंद घेतला. या चुरशीच्या लढतीत कु.अर्णव देवानंद म्हात्रे हा मुख्यमंत्री पदावर निवडून आला. त्याला १७ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार कु. स्वरा नितीन म्हात्रे हिस १४ मते मिळाली.निवडणूक सूरू असताना सरपंच महेश म्हात्रे, विकेश म्हात्रे,संदीप पाटील आदी ग्रामपंचायत सदस्य यांनी शाळेस भेट दिली व निवडणूक प्रक्रिया समजून घेत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिला काबाडी यांचे मार्गदर्शन लाभले तर शिक्षक प्रशांत भोसले यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले.शिक्षिका प्रगती पाटील यांनी बूथ व्यवस्था पाहिली आणि शांततेच्या वातावरणात मतदान पार पडले. देशाच्या निवडणुकीचा हक्क मिळण्याअगोदर विद्यार्थ्यांनी लोकशाहीच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाल्याने राजकीय शिदोरी विद्यार्थीदशेत मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांमध्ये ओसंडून वाहत होता.