भिवंडी ( प्रतिनिधी )शालेय विद्यार्थ्यांमध्ये लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यां बाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने भिवंडी शहरातील धामणकर नाका भागातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात एका विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी भिवंडी न्यायालयातील दिवाणी सह न्यायाधीश क स्तर श्रीमती एस.व्ही.
साळवी व श्रीमती पी.के.कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावर प.अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे संस्थाध्यक्ष विजय जाधव, माजी प्राचार्या अरुणा जाधव,अँड.नारायण अय्यर उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात भिवंडी न्यायालयातील न्यायाधीश एस.व्ही.साळवी यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून विद्यार्थीदशेत कोणत्या गोष्टीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे त्यामुळे ते एक यशस्वी नागरिक म्हणून आपले जीवन उज्वल बनवू शकतील यासाठी त्यांनी आपल्या जीवनातील अनेक प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले.तर दिवाणी सह न्यायाधीश श्रीमती पी.के.कदम यांनी लैगिंक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण या पोस्को कायद्याच्या कायदेशीर तरतुदी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या.
कायद्याच्या तरतुदींबाबत विद्यार्थी अनभिज्ञ राहत असल्या मुळे त्यांना आपल्यावर होणाऱ्या अन्याया बाबत नेमके काय करावे हे माहीत नसते.विद्यार्थ्यांनी कोणती सतर्कता बाळगणे आवश्यक आहे ज्यामुळे समाजातील अनेक वाईट घटनांना वेळीच प्रतिबंध घालता येऊ शकतो याबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाच्या सहशिक्षिका रश्मी मोहरकर यांच्या मार्गदर्शनातून पोक्सो कायद्याच्या जनजागृती निमित्ताने इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी व पथनाट्याचे सादरीकरण केले. विद्यालयाचे प्राचार्य सुधीर घागस यांनी कार्यक्रम प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षिका अनिता धानापुने यांनी तर शिक्षक ज्ञानेश्वर गोसावी यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आर.एस.शिंदे,
पर्यवेक्षक व्ही.ए.मोरे,
आर.एच.जाधव यांनी विशेष मेहनत घेतली.सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.