पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपूर्णपणे मेट्रोचे श्रेय’
भिवंडी (शरद भसाळे) भिवंडीतील लाखो नागरिकांचा डिसेंबरपासून ठाण्यापर्यंत वाहतूककोंडीविना प्रवास शक्य होणार आहे. ठाणे-भिवंडी मेट्रोचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असून, लवकरच सेवा सुरू होईल, अशी माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे दिली. त्याचबरोबर भिवंडी मेट्रोसाठी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात असून, श्रेयवादात आपल्याला पडायचे नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच मेट्रोचे संपूर्ण श्रेय आहे, असे माजी केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.यावेळी मेट्रो प्रकल्प अधिकारी, तसेच माजी सरपंच श्रीधर पाटील, छत्रपती पाटील, भिवंडी मनपाचे नगरसेवक सुमित पाटील, निलेश चौधरी,राम माळीअदि पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर आठवडाभरापूर्वी गाडीची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर भिवंडीतील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मेट्रो मार्गावरील धामणकर नाका, अंजूरफाटा आणि काल्हेर येथील स्टेशनची पाहणी केली. काल्हेर स्टेशनमध्ये मेट्रो प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. त्यात एमएमआरडीए च्या अधिकाऱ्यांकडून मेट्रो मार्गाची व कामाच्या प्रगतीची सविस्तर माहिती देण्यात आली.
अंजूरफाटा येथे लिफ्ट व इलेव्हेटर बसविण्यासाठी जागा ताब्यात घेताना काही अडचणी आहेत.

संबंधित जागेचे भूसंपादन करावयाचे आहे. तेथील जागामालकाबरोबर दूरध्वनीवरुन संपर्क साधून मेट्रोच्या कामासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. या भूसंपादनातील अडचणी लवकरच दूर होतील, असा विश्वास माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला.
भिवंडीकरांसाठी मेट्रो ही अत्यावश्यक असून, येत्या दोन महिन्यांत मेट्रो सुरू होऊन नागरिकांचा प्रवास सोपा होईल. प्रवास गतीमान होऊन उद्योगाला चालना मिळेल. भिवंडी शहरातील वाहतूक कोंडीची परिस्थिती पाहून आपण २०१६ मध्ये ठाण्याहून मेट्रो सेवा भिवंडी-कल्याणपर्यंत नेण्याची निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१८ मध्ये प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यावेळीठाणे-भिवंडी- कल्याण मार्गाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हा कल्याणमध्ये झाला होता.

त्यामुळे कल्याणपर्यंत मेट्रोला मंजुरी त्यावेळीच मिळाली होती.भिवंडी मेट्रोचे श्रेय केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आहे. त्यांचे योगदान भिवंडीकर कधीही विसरणार नाहीत. असे कपिल पाटील यांनी स्पष्ट केले. महायुतीचे सरकार असताना सर्वांनी पथ्य पाळण्याची गरज आहे. स्वत: श्रेय घेत असताना ज्यांनी मेट्रोसाठी योगदान केले. त्यांच्या नावाचा उल्लेख करणे गैर नाही, अशी भूमिका कपिल पाटील यांनी मांडली. आपण ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोसाठी पाठपुरावा केला. पण कल्याणपुढे जाणाऱ्या मेट्रो-५ अ मध्ये स्थानिक खासदारांचे योगदान आहे, असे ते म्हणाले. तत्पूर्वी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे धामणकर नाका, अंजुर फाटा आणि काल्हेर येथे भाजपचे कार्यकर्ते व नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.

