..
भिवंडी (शरद भसाळे ) पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या संकल्पनेतील महत्वकांक्षी मानल्या जाणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्प ५ अंतर्गत मेट्रो ट्रेनची महत्त्वपूर्ण चाचणी कापूरबावडी ते धामणकर भिवंडी या साडे तेरा किमी अंतरा दरम्यान मंगळवारी पार पडली.त्यामुळे नागरिकां मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र ही चाचणी घेताना भिवंडी आमदार महेश चौघुले, महापौर नारायण चौधरी यांना मेट्रो प्रकल्प अधिकाऱ्यांनी निमंत्रित न केल्याने उपस्थित काही नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

भिवंडीत आज मेट्रो रेल्वे ची चाचणी होणार असल्याची चर्चा असल्याने धामणकर नाका परिसरात रस्त्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.मेट्रो ट्रेनची महत्त्वपूर्ण चाचणी कापूरबावडी ते धामणकर भिवंडी या साडे तेरा किमी अंतरापर्यंत आज मंगळवारी दुपारी पार पडली.मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे अधिकाऱ्यांनी ट्रेनमध्ये बसून मेट्रो प्रवासाचा आनंद घेतला.
कापूरबावडी ते धामणकर नाका दरम्यान कापूरबावडी, बालकुम, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूर फाटा धामणकर नाका या सहा स्थानकांचा समावेश असणार आहे.सदर मेट्रोमध्ये ६ कोचची आसन व्यवस्था असून एका कोचमध्ये ५० जणांच्या बसण्याची व्यवस्था असून ६ कोचमध्ये ३०० जणांच्या बसण्याची व्यवस्था असणार आहे.तर ट्रेनची लांबी १३६ ते १३८ मीटर असून येत्या डिसेंबर पर्यंत ही मेट्रो सुरू होणार असल्याचा विश्वास यावेळी मेट्रो प्रकल्प अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.दरम्यान या मेट्रो मुळे भिवंडीकरांना काही प्रमाणात वाहतूक कोंडीतून सुटका मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

