भिवंडी ( शरद भसाळे ) दिवाळीच्या पावन पर्वावर भिवंडी तालुक्यातील कशेळी गांव येथील व्हाईट हाऊस सभागृहात शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांच्या पुढाकाराने स्थानिक ग्रामस्थ व मित्रमंडळ साठी आयोजित ” दिवाळी सकाळ दीपोत्सव भक्तीगीत ” कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात,
दिव्यांच्या प्रकाशात आणि सुरेल आवाज वाद्य वृंद निनादात संपूर्ण श्रोतेगण भक्तिरसात न्हाऊन निघाले.

कार्यक्रमाची सुरुवात गणपती पुजन व दीपप्रज्वलनाने झाली.शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख देवानंद थळे,ठाणे मनपा माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते,जेष्ठ शिवसेना नेते कृष्णकांत कोंडलेकर,
कशेळी ग्रामपंचायतीचे सरपंच वैशालीताई थळे,उपसरपंच राहूल तरे, प्रकाश पाटील,माजी सरपंच पलजूबाई थळे, अँड,किरण जाधव,हभप काशिनाथ माळी,सुजाता सोनावणे, धनश्री पाटील, जयेश कराळे,भूषण देशमुख, विश्वनाथ जाधव, निलेश पाटील, शैलेश मांजरेकर,
ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तसेच गांवातील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, युवक आणि लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमस्थळी दिवे,आकाश कंदील, फुलांची आरास आणि आकर्षक रांगोळीने सजवण्यात आले होते. दीपोत्सवामुळे गांवात दिवाळीचा खरा आनंद द्विगुणित झाल्याचे चित्र निर्माण झाले होते,या कार्यक्रमात स्थानिक कलाकार तसेच निमंत्रित गायकांनी भक्तीगीते, अभंग, भजने आणि भावगीते सादर केली. ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘विठू माऊली तू माऊली जगाची’, गीतांना
उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. तबला, पेटी, टाळ-मृदंगाच्या साथीने वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते, सर्वांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या शुभेच्छा भाषणात त्यांनी सांगितले की, दिवाळी हा अंधारातून प्रकाशाकडे जाणारा सण आहे. अशा भक्तीगीत कार्यक्रमांमुळे गांवातील एकोपा, संस्कृती आणि परंपरा टिकून राहते.आपले जीवन हे अमुल्य आहे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

राजकीय हेवेदावे बाजूला ठेवूनगांवाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आयोजित केलेला हा कार्यक्रम इतर गावांसाठी आदर्श असल्याचे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले.आयोजक देवानंद थळे यांनी उपस्थितीत सर्वांचे आभार मानले. पुढील वर्षीही असा भव्य कार्यक्रम आयोजित केला जाईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. दिवाळी औचित्य साधून उपस्थितांना फराळाचे वाटप करण्यात आले आणि चहाचा आस्वाद घेत ग्रामस्थांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
दिवाळी सकाळ दीपोत्सव भक्तीगीत कार्यक्रमामुळे कशेळी गांवातील दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदमय, भक्तिमय आणि एकोप्याची ठरली. असा सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी व्हावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

