भिवंडी ( प्रतिनिधी) भाजपा सरकारने देशातील 90 टक्के दलित,आदिवासी,बहुजन समाज आणि अल्पसंख्यांक समाजाला विकासापासून दूर ठेवून त्यांच्यावर अन्याय केला आहे.देशातील कोणत्याही मोठ्या उद्योगांवर मोठ्या माध्यमांवर कधी या समाजातील व्यक्ती तुम्हाला काम करताना दिसणार नाही सर्वात मोठे दुर्दैव असे परखड मत काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भिवंडीत झालेल्या कार्यक्रम सभेत व्यक्त केले. यावेळी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेनी मोठ्या प्रमाणात फुले उधळून त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सायंकाळी भिवंडीत दाखल झाली.यावेळी त्यांच्या सोबत माजी मंत्री आरिफ नसीम खान,विश्वजित कदम, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे,
शहराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन हे उपस्थित होते.इलेक्ट्रॉल बाँड च्या माध्यमातून कंपनी मधील कोट्यवधी रुपये भाजपाने वसुल केले आहेत. देशातील 20 ते 25 मोठ्या उद्योजकांचे 16 लाख कोटींची कर्जमाफी केली पण सर्वसामान्य शेतकरी व जनतेची पिळवणूक केली. देशातील छोटे उद्योग व्यवसाय यांना भाजपाने देशोधडीला लावले असून यंत्रमाग व्यवसायाकडे भाजपा सरकारने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे लाखो मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

यंत्रमाग व्यवसायिक,शेतकरी,तरुण,महीला हे सर्वच बेजार झाले असून देशात जातीय जनगणना करण्यावर काँग्रेस ठाम असून भाजपाची हुकूमशाही मोडून काढण्याची वेळ आली आहे असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे.या यात्रे निमित्त संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण दिसून आले.राहुल गांधी यांचे स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, समाजवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित होते.पालघर जिल्ह्यातून अंबाडी येथून महापोली, नदीनाका, शेलार,वंजारपट्टी नाका ,बागे फिरदौस ते स्व.आनंद दिघे चौक या यात्रे जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी गांधी यांनी जनतेशी संवाद साधून भाजप पक्षावर जोरदार हल्लाबोल भाषण केले. यावेळी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.