लोखंडी सांगडा हटवण्याची सरपंच वैशाली थळे केली मागणी..
भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी-ठाणे मार्गावरील कशेळी येथील काही वर्षांपासून बंद असलेल्या टोल नाक्याची सध्या अत्यंत दुरावस्था झाली असून त्याचा लोखंडी सांगडा धोकादायक अवस्थेत उभा आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाने हा लोखंडी सांगडा तातडीने हटवावा, अशी मागणी कशेळी गावाचे सरपंच वैशालीताई देवानंद थळे यांनी केली आहे.

भिवंडी-ठाणे मार्गावर सिमेंटच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराने वाहनांकडून टोल वसुलीसाठी कशेली येथे टोल नाका उभा केला होता. मात्र काही वर्षांपूर्वी टोल वसुली बंद झाल्यानंतर हा टोल नाका पूर्णपणे ओसाड झाला असून तेथे असलेली केबिन मोडकळीस आली असून सध्या तुटलेल्या अवस्थेत आहे. लोखंडी पत्रे अनेक ठिकाणी तुटलेली असून त्यांना आधार देणारे खांब गंजल्यामुळे संपूर्ण संरचना कमकुवत झाली आहे. अशा स्थितीत या टोलनाक्याच्या आजूबाजूने वाहतूक सुरु आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात वादळी वारा किंवा मुसळधार पावसाच्या सरींमुळे हा लोखंडी पत्रे असलेला सांगडा कोसळण्याची भीती सरपंच वैशाली देवानंद थळे यांनी व्यक्त केली आहे. आहेत. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी या ओसाड टोल नाक्यावर असामाजिक तत्त्वांचा वावर वाढत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच येथे प्रवासी, पादचारी आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे या मार्गावर पोलीस गस्त आवश्यक असल्याचे मत शिवसेना जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी व्यक्त केले आहे. टोलनाक्याच्या परिसरात देखभालीकडे तत्कालीन ठेकेदाराचे दुर्लक्ष झाल्याने संपूर्ण परिसराची दुरावस्था झाली आहे. त्याच प्रमाणे ठेका देणाऱ्या संबधित शासकीय विभागाने अशा टोल नाक्याकडे दुर्लक्ष केल्याने भिवंडी तालुक्यातील कवाड टोलनाक्यावर देखील हा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर संबंधितांकडून कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे शासनाच्या संबंधित विभागाने कशेळी टोलनाक्याच्या लोखंडी सांगाड्याची गंभीर दखल घेत तो काढून कारवाई करून पादचारी ग्रामस्थ व प्रवासी नागरिकांसाठी आणि वाहनांसाठी सुरक्षित मार्ग तयार करावा,अशी मागणी सरपंच वैशाली थळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याकडे केली आहे.

