सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकल्यास दहा हजार रुपयांचा दंड..
भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी तालुक्यातील ग्रामीण ही ठाणे जिल्ह्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जात असुन या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात गावाचे शिवसेना पक्षाच्या सरपंच वैशालीताई देवानंद थळे व सदस्य हे नेहमी शासन निर्देशानुसार विविध उपक्रम राबवून स्थानिक पातळीवर गावाचे नाव उंचीवर नेण्याचा प्रयत्न करीत असतात,
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आता गावात
प्लास्टिक पिशवी वापर बंदी व कशेळी स्वच्छ गांव ठेवण्याचा उपक्रम हाती घेतला असुन सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकल्यास दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई आणि रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या व्यक्तीस पकडून दिल्यास पाच हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा
सरपंच वैशालीताई थळे यांनी केली आहे.
त्यामुळे ग्रामस्थ व सदस्यांनी या निर्णय घोषणेचे स्वागत केले आहे.
भिवंडी ठाणे महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असुन परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशवी वापर होत असुन प्लास्टिक कचरा रस्त्यावर आणि गटार व नाल्यात टाकला जात असल्याने पावसाळ्यात गटार व नाले तुडुंब भरल्याने पाणी निचरा होत नाही त्यामुळे पडत असलेल्या पावसामुळे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गटार व नालेसफाई कामे झाली असताना मोठ्या प्रमाणात
प्लास्टिक कचरा आढळून आल्याने सरपंच वैशालीताई देवानंद थळे यांनी ग्रामपंचायत सदस्य यांच्या सोबत चर्चा करून कशेळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात प्लास्टिक बंदी चे आवाहन केले आहे. तसेच सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकण्यास बंदी केली असुन रस्त्यावर कचरा टाकल्यास दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल असा इशारा दिला आहे. तसेच रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यास पकडून दिल्यास पाच हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व प्रदूषण रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी व दुकानदारांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच वैशालीताई थळे यांनी केले आहे.

