रस्त्यावर घाणीचे दुर्गंधीचे साम्राज्य
भिवंडी (शरद भसाळे) भिवंडी शहरातील चाविंद्रा रामनगर येथील डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास आलेल्या डंपरच्या धडकेत तीन वर्षीय शनाया या मुलीचा
हकनाक बळी गेला या घटने नंतर स्थानिक नागरिकांच्या भावना तीव्र संतप्त झाल्या असून त्यांनी येथील पालिकेची कर्मचाऱ्यांची कॅबिन जाळून डंपर जाळला होता.त्यानंतर स्थानिक
नगरसेवक व नागरिकांनी तेथील डंपिंग ग्राउंडवर मनपा प्रशासनाला कचरा टाकण्यास कडाडून विरोध केल्याने गेल्या तीन दिवसांपासून शहरातील कचरा डंपिंग ग्राउंड वर टाकला जात नसल्याने
महापालिका अधिकाऱ्यांची पंचायत झाली आहे.

त्यामुळे शहरातील विविध भागात व मुख्य रस्त्यावर सर्वत्र कचऱ्याचे ढीग लागले असून त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी व अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे राज्य शासनाने याबाबत सविस्तर चौकशी करावी अशी मागणी होत आहे.
गेल्या तीन दिवस भिवंडी शहरातील कचरा घंटागाड्या मधून उचलून नेल्यानंतर टाकायचा कोठे हा प्रश्न आयुक्त प्रशासना समोर उभा राहिला आहे.ज्यामुळे रस्त्याकडेला उड्डाणपुला खाली कचऱ्याचे ढीग लागले असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता पसरली आहे.यामुळे अशा रस्त्यां वरून जाताना महिला व नागरिकांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे.सध्या पालिका प्रशासनाकडून प्रभाग समिती निहाय कचरा संकलन केंद्र असणाऱ्या ठिकाणी कचरा जमा केला जात आहे .परंतु येथील जागेची क्षमता नसल्याने येथेही कचरा पडून ढीग लागले आहेत.येथील अपघातात जीव गमावणाऱ्या चिमुकलीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी.या ठिकाणी कचरा घेऊन येणाऱ्या नादुरुस्त वाहन तत्काळ बंद करावी,
प्रत्येक वाहन चालका सोबत क्लिनर असावा येथील डंपिंग ग्राउंडची क्षमता संपली असल्याने ते तत्काळ बंद करावे अशा मागण्या नगरसेवक रोहिदास वाघमारे यांनी महापालिका प्रशासन सोबत झालेल्या बैठकीत केल्या आहेत.सार्वजनिक आरोग्य विभाग प्रमुख फैजल तातली यांच्याशी संपर्क केला असता तेथील नागरिक व नगरसेवक यांच्या सोबत चर्चा सुरू असुन लवकरच रस्त्यावरील कचरा उचलण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

