भिवंडी मनपाच्या निलंबित ९ कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यासाठी भा.का.क.महासंघ युनियनच्या प्रदेश सचिवानी घेतली उपायुक्तांची भेट…

भिवंडी

भिवंडी (शरद भसाळे ) भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या प्रभारी नऊ भूभाग लिपिकांनी मालमत्ता कर वसुली कमी केल्याचा ठपका ठेऊन प्रशासनाने १७ मार्च रोजी त्यांना निलंबित होते. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू करून घेण्यासाठी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्यावतीने महापालिका आयुक्त व महापौर यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. तरी देखील महापालिका आयुक्त प्रशासनाने या बाबत कोणत्याही प्रकारची हालचाल न केल्याने युनियनचे प्रदेश संघटक सचिव लक्ष्मण कुडव यांनी भिवंडीत येऊन युनियनच्या पदाधिकाऱ्यांसह महापालिकेच्या उपायुक्त सपना वसावा यांची भेट घेऊन महापालिकेचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने निलंबित कर्मचाऱ्यांना कामावर हजर करून घ्यावे,अशी मागणी केली. यावेळी मनपाचे सहाय्यक आयुक्त शैलेश दोंदे,युनियनचे भिवंडी युनिट अध्यक्ष भानुदास भसाळे व श्रीपत तांबे बैठकीत उपस्थित होते.
भिवंडी महानगर पालिकेच्या निलंबित नऊ कर्मचाऱ्यांचे म्हणणे व खुलासा न मागता महापालिका प्रशासनाने त्यांच्यावर चुकीची निलंबन कारवाई केली आहे. कर्मचाऱ्यांना मालमत्ता वसुलीसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत दिली होती.परंतु त्यापूर्वीच प्रशासनाने नऊ कर्मचाऱ्यांना निलंबित केले. त्यामुळे मनपाचे मोठे नुकसान झाल्याचे मत संघटक सचिव लक्ष्मण कुडव यांनी बैठकीत मांडले. महापालिका आयुक्त प्रशासनाने ४०० कोटी मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले असताना केवळ १०३ कोटीची वसुली झाली आहे. त्यामुळे मनपाची २९७ कोटीची वसुली होऊ शकली नाही.याला जबाबदार कोण ?त्यामुळे मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील प्रशासकीय नियमानुसार कारवाई होणे आवश्यक आहे,अशी बाजू कुडव यांनी मांडली. तरी देखील सहानुभूती म्हणून दोन्ही बाजू तपासून कर्मचाऱ्यांची कोणतीही चौकशी न करता त्यांना तात्काळ कामावर हजर करून घ्यावे आणि काम करण्याची संधी द्यावी. महापालिका प्रशासनाने कामगारांना निलंबित न करता त्यांची बदली केली असती तर मनपाचे नुकसान टळले असते. असे न करता मनपाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून मालमत्ता कर वसुली विभागाचे नुकसान केले आहे. या बाबत आत्मपरीक्षण करावे आणि त्यांना कामावर घ्यावे,अशी पालिकेत युनियनच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत केली.