भिवंडी कल्याण मेट्रो रेल्वे प्रकल्प अखेर मार्गी लागला..

भिवंडी

भुयारी मार्गास शासन आदेश प्रसिद्ध..

भिवंडी ( प्रतिनिधी ) गेल्या काही वर्षांपासून
बहुचर्चित असलेला ठाणे भिवंडी कल्याण हा मेट्रो रेल्वे प्रकल्प पाच अंतर्गत भिवंडी कल्याण या उर्वरित मार्गीकेस अखेर महाराष्ट्र शासनाने अधिक निधी मंजूर करून निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.आणि त्यासंबंधीचे शासन आदेश बुधवार ( दि.२२) रोजी मुंबई येथे मंत्रिमंडळाच्या उपसमिती बैठकीत मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती भिवंडी पुर्वचे आमदार रईस शेख यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम आता गतिमान पद्धतीने सुरू झाले आहे.मुंबई येथे ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्ग ५ प्रकल्पातील टप्पा क्रमांक २ मधील धामणकर नाका ते दुर्गाडी चौक व मेट्रो रेल्वे प्रकल्प ५ अ मधील दुर्गाडी – आधारवाडी – खडकपाडा – कल्याण आणि भोईरवाडी – उल्हासनगर या विस्तारित प्रकल्पाच्या अंमलबजावणी करण्यास सुधारित किंमतीस मान्यता देण्या बाबत बैठक घेण्यात आली.ठाणे भिवंडी या पहिल्या टप्प्यात ११.९०० किमी अंतरात ६ स्थानके असणारा असून त्यासाठी ६७४१ कोटी ३४ लाख तर त्यापुढील धामणकर नाका ते दुर्गाडी दरम्यानच्या १०.४७५ किमी अंतरात धामणकर नाका ते साईबाबा नाका दरम्यान भुयारी मार्ग असून त्यामध्ये एकूण ६ स्थानकांपैकी एक स्थानक भुयारी मार्गावर असणार आहे.या प्रकल्पासाठी ७३२६ कोटी १३ लाख खर्च केले जाणार आहेत.या संपूर्ण प्रकल्पा ला मान्यता देताना ८४१६ कोटी ५१ लाख रुपये खर्च केले जाणार होते.परंतु कालावधी वाढल्याने अतिरिक्त खर्च केले जाणार आहेत.या प्रकल्पा साठी आम्ही सुरवाती पासून आग्रही होतो.त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला असून भिवंडीत भुयारी मेट्रो रेल्वे उभारली जात असतानाच या मार्गावर अरुंद उड्डाणपूल काढून चार पदरी उड्डाणपूल उभारले जाणार असल्याने या मार्गावर महापालिका प्रशासनाकडून लवकरच रस्ता रुंदीकरण केले जाणार असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी पत्रकारांना दिली.