भिवंडी (प्रतिनिधी )भिवंडी शहरातील ताडाळी या गावात राहणाऱ्या नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा यांच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र शिरलेल्या तिघा दरोडेखोरांनी हत्यारांचा धाक दाखवून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 21 लाख 15 हजार रुपयेचा ऐवज घेऊन पसार झाले आहेत.या दरोड्याने परिसरात खळबळ माजली आहे.याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार भिवंडी शहरातील जुनी ताडाळी या ठिकाणी शंकर निवास हा बंगला असून पहिल्या मजल्यावर माजी नगराध्यक्षा साधना लहू चौधरी या कुटुंब सोबत राहतात. मध्यरात्री एक ते चार वाजताच्या दरम्यान त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे लॅच लॉक तोडून घरात शिरलेल्या 20 ते 35 वयोगटातील तिघा अज्ञात दरोडेखोरांनी साधना चौधरी झोपलेल्या बेडरूम मध्ये प्रवेश केला यावेळी झोपेतून जागे झालेल्या साधना यांच्या वर लोखंडी कटावणी उगारून मारण्याची धमकी देत त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या बेडरूम मधील लाकडी कपाटाचे लॉकर मधील 50 तोळे वजनाचे विविध वर्णनाचे सोन्याचे दागिने व 95 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 21 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून पळून गेले आहे.या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून साधना चौधरी यांनी दिलेल्या तक्रारी वरून नारपोली पोलिस ठाण्यात जबरी दरोडा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार करीत आहेत.
