ऐन निवडणूक काळात समाजवादी पक्षाचे
आमदार रईस शेख यांनी दिला तडकाफडकी राजीनामा.
भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे आमदार रईस कासम शेख यांनी आपल्या आमदारपदाचा राजीनामा पक्ष अध्यक्ष अबु आझमी यांच्या कडे दिल्याने शहरात खळबळ माजली असून आमदारांनी राजीनामा मागे घेण्यासाठी शहर कार्यालयाबाहेर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. आमदार रईस शेख यांनी आपल्या आमदार पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांच्याकडे सुपूर्द केला असून ऐन लोकसभा निवडणूक दरम्यान हा राजीनामा दिल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. तर या राजीनाम्याची भिवंडी शहरातील राजकारण ढवळून निघणार असून भिवंडी पूर्वचा राजीनामा हि विधानसभा निवडणुकीची नांदी असल्याचे देखील बोलले जात आहे.

वास्तविक महाआघाडीचे उमेदवाराचे या भागातील काम आमदारांकडे दिले होते,अशी चर्चा सुरु आहे. त्यांनी अंतर्गत राजकीय कुरघोडीच्या राजकारणातून हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.
या राजीनामा बाबत समाजवादी पक्षाच्या स्थानिक कार्यालयातून आमदार रईस शेख यांच्याकडून माहिती देण्यात आली कि, राज्यात विस्तार करण्यासंदर्भात माझी काही भूमिका आहे. गेले वर्षभर मी त्यासंदर्भातले मुद्दे राज्य नेतृत्वाकडे मांडतो आहे. त्यावर पक्षाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.माझी समाजवादी पक्षावरील निष्ठा कायम आहे. पक्षाने मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. मी पक्षाचा एक कट्टर कार्यकर्ता आहे आणि सदैव राहीन. मी आमदार नसलो तरी पक्षाची संघटनात्मक ताकद आणि विस्तार वाढवण्याची माझी बांधिलकी कायम आहे. मी उपस्थिती केलेल्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आजमी यांच्याकडे दिला आहे. मला आशा आहे की राज्यातील पक्षनेतृत्व पक्षाच्या हिताचा उचित निर्णय घेईल,असे आ.शेख यांनी सांगितले आहे.