भिवंडीतील श्वान निर्बीजीकरण केंद्रात स्वच्छतेचा अभाव ;प्राणी मित्रांकडून मनपा प्रशासनावर नाराजी..

भिवंडी

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून शहरातील ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणी वर आला आहे.महापालिकेचे महापौर नारायण चौधरी व आयुक्त प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
भिवंडी शहरातील ईदगाह,शांतीनगर,
कामतघर,नागाव गायत्रीनगर,निजामपूर,
बाजारपेठ, भिवंडी एसटी बस स्थानक, कोंबडपाडा,
गोकुळ नगर,म्हाडा काँलनी,अशा विविध भागात मोठ्या प्रमाणावर भटके कुत्रे असून त्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिका आयुक्त प्रशासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागास अपयश आले आहे.गेल्या सहा महिन्याचे कालावधीत 50 हुन अधिक लोकांना भटक्या कुत्र्यानी चावे घेतल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. झालेल्या घटनेमुळे शहरातील नागरिकां मध्ये विशेषतःमहिला व विद्यार्थी, लहान मुलांमध्ये भटक्या कुत्र्यांचा दहशत कायम आहे.
महापालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी श्वान निर्बीजीकरण केंद्र ११ नोव्हेंबर २०२४ मध्ये बंद असलेले पुन्हा नव्याने सुरू केले.व्हेट्स सोसायटी फॉर ॲनिमल वेल्फेअर अँड रुरल डेव्हलपमेंट या संस्थेस हे काम सोपवले असून त्यासाठी संस्थेस प्रति श्वानाच्या नसबंदी वर १४४० रुपये दिले जातात.शहरात साधारण २४ हजारांहून अधिक भटके कुत्रे असून आज पर्यंत सुमारे ७ ते ९ हजारांपर्यंत श्वानांची लसीकरण व निर्बीजीकरण करण्यात आल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.
महापालिकेने सुरू केलेल्या या श्वान निर्बीजीकरण केंद्रात प्रचंड अस्वच्छता पसरली असून निर्भीजीकरण केंद्राच्या स्वच्छतेकडे संस्थेचे व महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून त्यामुळे श्वानांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची माहिती प्राणी मित्र दिप्ती देशमुख यांनी दिली आहे.श्वान निर्भीजीकरण केंद्रातील अस्वच्छतेबाबत आपण वारंवार महापालिका आयुक्त प्रशासनाकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत मात्र तरीही मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.तसेच श्वान निर्बीजीकरण केंद्राचा ठेका घेणाऱ्या संस्थेने सुध्दा स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे,श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केलेल्या श्वानांना एकाच शेल्टर मध्ये ठेवले जात असून या श्वानांचे विष्टा व उल्टी शेल्टर मध्ये तशीच पडून असते.ही घाण कोणीही साफ करत नसल्याने शेल्टर मध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून जर अशी अस्वच्छता कायम राहिली तर संसर्ग होऊन अनेक श्वानांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते अशी माहिती प्राणी मित्र दिप्ती देशमुख यांनी दिली आहे.याठिकाणी एकाच सापळ्यात पाच पाच कुत्रे ठेवले जातात.ज्यामुळे शस्त्रक्रिया झालेल्या कुत्र्यां मध्ये भांडण होण्याने ते पुन्हा जायबंदी होत आहेत. तर ज्या भागातून कुत्रे आणले जातात ते कुत्रे त्याच भागात सोडले पाहिजेत परंतु अनेक वेळा कुत्रे वेगळ्याच विभागात सोडले जात असल्याने त्या कुत्र्यांना स्थानिक कुत्रे सामावून घेत नसल्याने त्यांच्यात वाद वाढताना,नव्या जागेत खायला मिळत नाही त्यामुळे त्यांच्यात रागीट पणा वाढीस लागत आहे अशी तक्रार त्यांनी केली आहे.