भिवंडी शिक्षण विभागाकडून जिल्हा बदली झालेल्याशिक्षकांचे आदेश तात्काळ रद्द करूनचौकशी करण्याची महापौरांनी केली मागणी..

भिवंडी

आयुक्तांना दिले पत्र..

शिक्षकां मध्ये उडाली धावपळ..

भिवंडी (प्रतिनिधी ) : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणावर आंतरजिल्हा बदली करण्यात आल्या आहेत. त्याचा प्रतिकूल परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर व अध्यापनाच्या गुणवत्तेवर होत आहे. त्यामुळे भिवंडी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांचे आदेश तात्काळ रद्द करण्याची मागणी महापौर नारायण चौधरी आणि शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.

तसेच झालेल्या बदल्या प्रकरणी महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी विशेष चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण विभाग कार्यालय व शिक्षकां मध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
भिवंडी महापालिकेच्या शिक्षण विभागात सुमारे ७५० शिक्षक कार्यरत आहेत. तरी देखील पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत शिक्षकांची मोठी कमतरता आहे. महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागासाठीचा २०२५ चा शिक्षक कोटा अद्याप मंजूर झालेला नाही. मात्र महानगरपालिका निवडणुकीच्या काळात नियमबाह्य पद्धतीने अशाप्रकारे मोठ्या संख्येने शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. १६ जानेवारी २०२६ रोजी महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी १० शिक्षकांच्या विविध जिल्ह्यांमध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, २२ जानेवारी २०२६ रोजी, पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे चार शिक्षकांची दिशाभूल करून त्यांच्या बदल्या बेकायदेशीर ठरवण्यात आल्या आहेत.त्यामुळे याबाबत शिक्षण मंडळातील शिक्षक व सामाजिक कार्यकर्तेनी संशय व्यक्त करून झालेल्या बदली बाबतीत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भिवंडी महानगर पालिकेच्या शिक्षण विभागातून झालेल्या अशा बदलीनंतर रिक्त झालेल्या पदांवर पर्यायी शिक्षकांची नियुक्ती झालेली नाही. तसेच इतर शहरातून पालिकेत शिक्षक आलेले नाहीत. यामुळे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये शिक्षकांची लक्षणीय कमतरता निर्माण झालेली असून, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर व अध्यापनाच्या गुणवत्तेवर होत आहे अशी माहिती महापौर नारायण चौधरी यांनी आयुक्त अनमोल सागर यांना दिली.

सदर परिस्थिती ही शैक्षणिक दृष्टीने बाब गंभीर स्वरूपाची आहे. भिवंडी शिक्षण विभागाकडून जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांचे आदेश तात्काळ रद्द करण्याची मागणी महापौर नारायण चौधरी यांनी पालिका आयुक्त अनमोल सागर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. तसेच मागील ५ वर्षांच्या कालावधीत भिवंडी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातून आंतरजिल्हा बदलीद्वारे इतर जिल्ह्यात गेलेल्या सर्व शिक्षकांची सविस्तर माहिती तात्काळ सादर करावी. तसेच सदर बदली एकतर्फी झाली आहे किंवा कसे, सदर बदली नंतर पर्यायी शिक्षक हजर झाले आहे किंवा कसे याप्रमाणे सविस्तर अहवाल आमचेकडे संबधितांस निर्देश व्हावेत, असे महापौर चौधरी यांनी पत्रात नमूद करून यापुढे कोणत्याही शिक्षकांची आंतरजिल्हा बदली करण्यात येऊ नये, असे स्पष्टपणे निर्देश दिले आहेत.

चौकट

भिवंडी महानगरपालिकेत गेल्या काही वर्षांपासून कर्मचारी व शिक्षकांचे मनमानी पद्धतीने बदल्या करण्यात आल्यामुळे शहराच्या विकास कामावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.काही कर्मचाऱ्यांकडून चिरीमिरी घेऊन त्यांच्या बदल्या मुख्यालय प्रशासनाकडून केल्या जात आहेत याबाबत पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर चौधरी यांच्या कडे तक्रार करताच महापालिका आयुक्त प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना महापौर कार्यालय व लोकप्रतिनिधींना माहिती देणे आवश्यक आहे अशी सूचना निर्देश दिले आहेत.