भिवंडी (भानुदास भसाळे ) भिवंडी लोकसभा मतदारसंघांचे खासदार तथा केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे वाढदिवसानिमित्ताने सुमारे ३५ ते ४० हजारांहून अधिक नागरिकांनी त्यांची भेट घेऊन दिवसभरात अभिष्टचिंतन केले.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विविध भागात
जिल्हा परिषदेचे सदस्य देवेंश पाटील, महापालिका माजी सभागृहनेते सुमित पाटील यांच्या पुढाकाराने सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्रम करण्यात आले.

या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण मतदारसंघात चैतन्ममय वातावरण निर्माण झाले होते. केंद्रीय पंचायत मंत्री पाटील यांचा मंगळवारी सामाजिक उपक्रम व संकल्प करीत वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.भिवंडी तालुक्यातील दिवेअंजुर येथील त्यांच्या निवासस्थानी स्नेहीजनांचा मेळा भरला होता. सकाळी ९ पासून रात्री १२ पर्यंत हजारो नागरिकांनी कपिल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सन्मान केला. काही नागरिकांनी पगडी, उपरणे, वीणा, चिपळ्या आणि तुळशीचा हार घालून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा गौरव केला.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध केंद्रीय मंत्री, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मंत्री, देशभरातील खासदार, आमदारांनी पाटील यांनी पत्र वा दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात वाढदिवसानिमित्ताने भाजप पक्ष पदाधिकारी यांनी विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले होते. भिवंडी तालुक्यातील अंजुर येथे केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक २०२४ भरविण्यात आला होता. या स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.जिल्हा परिषदेचे सदस्य देवेंश पाटील, महापालिका माजी सभागृहनेते सुमित पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेच्या शाळा व अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच रस्ते भूमीपूजन शुभारंभ सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.