भिवंडीतील गोदाम पट्ट्यात अग्निशमन केंद्र उभारण्यास शासनाकडून दिरंगाई

भिवंडी


कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर वसूली मात्र सुविधा नसल्याने नाराजी..
भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट मालाची साठवणूक करणारी गोदाम आहेत. या गोदामा मध्ये फर्निचर, इलेक्ट्रॉनिक सामान, कपडा आणि रासायनिक ज्वलनशील पदार्थ व इतर मालाची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जाते मात्र गोदाम चालक व मालक वर्गाकडून अनेक वेळा गोदाम सुरक्षितता बाळगण्यास दिरंगाई होत असल्यामुळे या गोदामांना मोठ्या प्रमाणात आगी लागल्याचे प्रकार घडत आहे,ही आग विझवण्यासाठी भिवंडी व ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करावे लागते वाहतूक कोंडीमुळे अग्निशमन दल जवान वेळेवर पोहोचत नाही त्यामुळे मालमत्तेचे मोठे नुकसान होते.


शासनाकडून विकास शुल्क नावाने मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर वसूल केला जात आहे.मात्र सुविधा उपलब्ध करुन देण्यास चालढकल होत आहे. ग्रामीण भागात अग्निशमन दल केंद्राची आवश्यकता आहे,शासनाकडे याबाबत वारंवार स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली आहे मात्र अद्याप शासनाने या संदर्भात कोणत्याही प्रकारची ठोस पावलं उचलली नसल्यामुळे व्यापारी व ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.राज्य शासनाने तातडीने भिवंडी ग्रामीण भागात स्वतंत्र सुसज्ज असे अग्निशमन केंद्र उभारावे अशी मागणी शिवसेनेचे ग्रामीण ठाणे जिल्हाप्रमुख व एमएमआरडीए सदस्य देवानंद थळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.


   गोदामांची नगरी म्हणून भिवंडीची ओळख शासनस्तरावर
निर्माण झाली आहे असुन राज्यातील नामांकित कंपन्यांची गोदामे भिवंडीत थाटली आहेत. सुमारे ५० हजारांहून अधिक गोदाम काल्हेर, कशेळी,पूर्णा,दापोडा,
राहनाळ,मानकोली कोनगांव,रांजणोली व पडघा अशा विविध ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात उभारण्यात आली आहेत.ग्रामीण भागाचा विकसित करण्याची जबाबदारी शासनाने एमएमआरडीए प्राधिकरणाकडे सोपविली परंतु गेल्या 10 वर्षांच्या काळात या भागात विकास शुल्क म्हणून कोट्यवधी रुपये जमा करणाऱ्या एमएमआरडीए प्रशासनाने भिवंडी ग्रामीण भागात स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारण्यात पुढाकार घेतला नाही.जेव्हा गोदामांना आग लागते त्यावेळेस भिवंडी व ठाणे, कल्याण मनपा अग्निशमन दलावर आग विझविण्याची वेळ येते.भिवंडी ग्रामीण भागातील रस्ते काही प्रमाणात अरूंद व खराब असल्याने अग्निशमन दलाचे गाड्या
वाहतूक कोंडीत अडकतात परिणामी घटनास्थळी पोहोचण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना उशीर होत असतो तोपर्यंत मालमत्ता जळून मोठे नुकसान होत असल्याची माहिती एमएमआरडीएचे सदस्य देवानंद थळे यांनी दिली.या गंभीर प्रश्नाकडे एमएमआरडीए प्रशासनाने  आजपर्यंत लक्ष दिले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.लागणारी भिषण आग विझविताना जवानांना संकटांचा सामना करावा लागतो ही शोकांतिका आहे. वाहतूक कोंडी, गोदाम भागातील अरुंद रस्ते व त्याठिकाणी पाण्याची कमतरता यामुळे या भागातील आग विझवितांना अग्निशमन दलाची मोठी दमछाक होते.ज्वलनशील रासायनिक पदार्थ साठवणूक केलेल्या गोदामाना भिषण आग विझविण्यासाठी अनेकवेळा सुविधा व पाणी पुरवठा उपलब्ध नसल्याने दोन दोन दिवस आग विझविण्यासाठी लागत असतात.
त्यामुळे मालमत्ता व वित्तहानी मोठ्या प्रमाणात होते.सन 2022 ते 2024 या तीन वर्षात शहरात 415, तर ग्रामीण भागात याच काळात 275 आगीच्या घटना घडल्याचे सुत्रांनी सांगितले तर या तीन वर्षाच्या काळात शहरात 414 तर ग्रामीण भागात 102 रेस्क्यू वर्दी केल्याचे सांगण्यात आले.
तरीही या भागांत स्वतंत्र अग्निशमन केंद्र का ? उभारले जात नाही असा सवाल शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांनी उपस्थित केला असुन राज्य शासनाने तातडीने भिवंडी ग्रामीण भागात सुसज्ज अग्निशमन केंद्र उभारण्यात यावे अशी मागणी केली आहे.
चौकट
स्वतंत्र अग्निशामक केंद्र उभारणीस  एमएमआरडीए प्राधिकरणाने सकारात्मक भूमिका घेऊन मंजुरी दिली आहे मात्र आजपर्यंत ही यंत्रणा का सुरू केली नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *