भिवंडी ( प्रतिनिधी) भिवंडी शहर परिसरात
मोठ्या प्रमाणावर अनधिकृत हुक्का पार्लर सुरू असून या ठिकाणी नवतरुण युवक हे धुरांच्या वलयात दम मारो दम करीत रंगून आपले जिवनाची अधोगती करीत आहेत.याबाबत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या कडे तक्रार जाताच त्यांनी पोलीस पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार भिवंडी पोलिसांनी शहरातील कल्याण रोड भागातील फुलेनगर येथील हुक्का पार्लर वर पोलिसांनी कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहेत.भिवंडी शहरातील कल्याण रोडवरील फुले नगर क्रमांक एक येथे एका बंद पडलेल्या यंत्रमाग कारखान्यात अरविंद वंजारी यांचा अनधिकृत हुक्का पार्लर सुरू आहे.तेथे हुक्का पार्लर चालक आपल्या चार कामगारांच्या मार्फत रविवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास हुक्का पिण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना तंबाखु मिश्रीत फ्लेवरचा हुक्का पिण्यासाठी उपलब्ध करून देत असतांना आढळून आल्याने भिवंडी शहर पोलिसांनी या पाच जणांसह हुक्का पिण्यासाठी आलेल्या 15 ग्राहकां विरोधात प्रतिबंधित कारवाई करीत तेथील 18 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंभार करीत आहेत. शहर परिसरात तसेच ग्रामीण भागातील काही हाँटेल धाब्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरू असून शालेय विद्यार्थ्यांसह नव युवकांचे नशापानामुळे जीवन बरबाद होत आहे.पोलिसांनी याप्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
