भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या तहसीलदार कार्यालय समोरील कोणार्क आर्केट या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या एटीएम च्या कॅश बॉक्सची तोडफोड करून चोरटयांनी 3200 रुपयांची चोरी केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे.याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भिवंडी शहर महापालिका मुख्यालय शेजारी व मुख्य शासकीय कार्यालय असलेल्या परिसरात कोणार्क आर्केट ही इमारत असून तळमजल्यावर बँक ऑफ बडोदा शाखेच्या बाजुच्या गाळ्यामध्ये बेसीन कॅथोलीक कॉ.ऑप. बँक लिमिटेड या बँकेचे एटीएम आहे.12 मार्च रोजी रात्री 10:45 वाजताच्या दरम्यान त्या ठिकाणी आलेल्या चोरट्यांनी एटीएम मशीनच्या असेंबली व कॅश शटर ची तोडफोड करुन एटीएम मशिनमधुन 3200 रुपये रक्कम काढून चोरी केली आहे. सदरचा प्रकार लक्षात आल्याने बँक व्यवस्थापक शिडवा पऱ्हायाड यांनी 16 मार्च रोजी तक्रार दिल्याने निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास वपोनि आव्हाड करीत आहेत.
