भिवंडी ( प्रतिनिधी )
भिवंडी शहर परिसरात निकृष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेले रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर ठेकेदारांने टाकलेला सर्व डांबर वाहून गेला असून फक्त खडी राहील आहे. जागोजागी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात असे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यामुळे नागरिक त्रस्त झालेल्या आहेत,खराब व खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत असतानाच महा पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणखी एक धक्कादायक गंभीर प्रकार समोर आला आहे.प्रसूती वेदना सुरू झालेल्या एका गर्भवती महिलेला रुग्णालयात नेत असताना रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रवास लांबला आणि अखेर कल्याण नाका परिसरात रिक्षामध्येच सदर महिलेची प्रसूती झाली.सुदैवाने आई आणि नवजात बाळाची प्रकृती स्थिर असून या घटनेने शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
महापालिकेच्या या गलथान कारभाराचा फटका या महिला बसला असता तरी सुदैवाने कोणत्याही प्रकारची मोठी हानी झालेली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले
भिवंडी शहरातील अजमेर नगर परिसरात राहणाऱ्या वर्षा कमलेश यादव या गर्भवती असल्याने घरी आराम करत असताना अचानकपणे त्यांना पोटामध्ये प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या त्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने त्यांना प्रवासी रिक्षातून तिला प्रसूती साठी भिवंडी शहरातील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात घेऊन निघाले.मात्र शहरातील रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रिक्षाला अत्यंत संथ गतीने प्रवास करावा लागला.अवघ्या पाच ते दहा मिनिटांत पूर्ण होणारा प्रवास तब्बल अर्धा ते पाऊण तास चालला.रस्त्यातील धक्के आणि खड्ड्यांमुळे प्रसूती वेदना तीव्र झाल्याने कल्याण नाका परिसरात रिक्षा येताच रिक्षामध्येच वर्षा यादव यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला.त्यानंतर तातडीने धावपळ करीत आई आणि नवजात बाळाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार,आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना रोजच जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.अपघात,वाहतूक कोंडी आणि आता रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी रिक्षातच झालेली प्रसूती या घटनांमुळे प्रशासनाच्या दुर्लक्षावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नागरिकांनी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून खड्डेमुक्त भिवंडी करण्याची मागणी केली असून,आणखी एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

