नशामुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक – आशुतोष डुंबरे

भिवंडी

भिवंडी ( शरद भसाळे ) नशामुक्त भारत आणि नशामुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी समाजातील प्रत्येक नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे.नशामुक्त मोहीम राबविण्यासाठी पोलीस प्रशासन आपल्या स्तरावर कार्य करत आहे, परंतु समाजातील सर्व सामाजिक, शैक्षणिक व सुज्ञ लोकांच्या सहभागा शिवाय ही मोहीम यशस्वी होणार नाही,अंमली पदार्थ विरोधी सुरू लढा संपूर्ण यशस्वी करण्यासाठी युवक व नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे,असे परखड मत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी भिवंडीत झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.


भिवंडी पोलीस परिमंडळ-2 कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्याचे हद्दीत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. नशामुक्त जनजागृती मोहिम अभियानात रिलस्पर्धा,जनजागृती करणारे भित्तीचित्र करणे, पथनाट्य, शालेय विद्यार्थी व युवकासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन जनजागृती केली त्यामुळे या यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्याचा कार्यक्रम अंजुर फाटा येथील हालारी ओसवाल सभागृहात आयोजित करण्यात आला होता. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी मनपा महापौर नारायण चौधरी,आमदार महेश चौगुले, खासदार सुरेश म्हात्रे, ठाणे सहपोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त अशोक दुधे भिवंडी पोलीस उपआयुक्त डॉ.पवन बनसोड तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे, विजय मराठे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.दोन गटात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथम,द्वितीय आणि तृतीय आणि प्रोत्साहन उत्तेजनार्थ पारितोषिके विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.पोलीस व नागरिकांनी एकत्र येऊन नशामुक्त महाराष्ट्र घडवू या त्यासाठी युवकांसह विविध समाजात प्रबोधन व जनजागृती होणे आवश्यक आहे असे मत पोलीस आयुक्त डुंबरे यांनी व्यक्त केले. पोलीस राबवित असलेल्या या मोहिमेला नागरिकांनी व युवकांची जास्तीत जास्त पाठिंबा देऊन उपक्रमात सहभागी व्हावे, भिवंडी शहरासह संपूर्ण महाराष्ट्र नशा मुक्त करावा ही काळाची गरज असल्याचे परखड मत महापौर नारायण चौधरी यांनी व्यक्त केले तर आमदार महेश चौगुले यांनी सांगितले की अंमली पदार्थामुळे युवकांचे आयुष्य बरबाद होत असून अंमली पदार्थ विरोधी मोहीम पोलिसांनी व सुज्ञ नागरिकांनी प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे.अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कडक कायदेशीर कारवाई करून अंमली पदार्थाचा समुळ नाश करावा असे आवाहन आ.चौगुले यांनी केले.कार्यक्रम सुत्रसंचालन संचालन मानसी राजे यांनी केले.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.