भिवंडीत विधी सेवा मंचाची स्थापना न्यायमूर्तींच्या हस्ते उद्घाटन सोहळा..

भिवंडी

वकीलांची कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती..

भिवंडी (शरद भसाळे) समाजामध्ये कायद्या विषयी जनजागृती निर्माण करणे, सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्क व कर्तव्यांची माहिती देणे तसेच गरजू व्यक्तींना कायदेविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे,या उद्देशाने भिवंडीत विधी सेवा मंच या सामाजिक व कायदेविषयक संस्थेची स्थापना करण्यात आली असून या मंचाचा उदघाटन सोहळा नुकताच मुंबई उच्चन्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी शहरातील मान्यवर वकील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


भिवंडी शहरातील अंजूरफाटा येथील शांती चंदन सभागृह येथे हा सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे
न्यायमूर्ती संदीप मारणे उपस्थित होते. तसेच ठाणे जिल्हा न्यायालयातील
ज्येष्ठ वकील विजय आगाशे, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे
सदस्य अँड. हर्षल पाटील, विधी सेवा मंचचे अध्यक्ष अँड. विशाल केशव भोईर,विधी सेवा मंचचे सचिव अँड.समीर
पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
विधी सेवा मंच न्यायव्यवस्था,वकिली क्षेत्र आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित राहून विधी सेवा मंचाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.यावेळी अँड. पंकज मंगेला,ॲड. समीर पाटील,अँड.शिरीष बोरकर,अँड. जितेंद्र शेटे,
अँड.अब्दुल बाकी अन्सारी,अँड. मनोज रायचा,अँड. विशाल पाटील,अँड.वैभव पाटील,ॲड.अजय पाटील,ॲड.सुरेश माटे, ॲड. अरविंद शर्मा, ॲड. सुनील तावरे,ॲड. स्मिता चिपळूणकर अदि मान्यवर वकील उपस्थित होते.विधी सेवा मंचाच्या माध्यमातून भविष्यात कायदेविषयक जनजागृती कायदेशीर मार्गदर्शन, विविध विषयांवरील व्याख्याने, कार्यशाळा, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन तसेच सामाजिक हिताचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत अशी माहिती मंचाचे अध्यक्ष अँड.विशाल केशव भोईर यांनी दिली “कायदा हा केवळ वकील आणि न्यायालयापुरता मर्यादित नसून प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी संबंधित आहे. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कायद्याची योग्य माहिती पोहोचवून न्याय आणि कायद्याविषयी जागरूक समाज निर्माण करणे, हे विधी सेवा मंचाचे प्रमुख उद्दिष्ट आहे अशी माहिती अँड. भोईर व अँड.हर्षल पाटील यांनी दिली.


विधी सेवा मंचाच्या उद्घाटन सोहळ्यास अँड. पंकज मंगेला,ॲड. समीर पाटील, अँड. शिरीष बोरकर, अँड. विशाल पाटील,अँड. वैभव पाटील,ॲड.अजय पाटील, ॲड. सुरेश माटे, ॲड. अरविंद शर्मा, ॲड. सुनील तावरे,ॲड. स्मिता चिपळूणकर वकील, विधी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना ‘कब्जाच्या कायद्यावर’ अभ्यासपूर्ण माहिती व मार्गदर्शन उपस्थितीतांना केले.कब्जा या संकल्पनेचे कायदेशीर महत्त्व, त्यासंबंधीचे विविध न्यायिक तत्त्व, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कब्जा,मालकी हक्क आणि कब्जा यांतील मूलभूत फरक तसेच कब्जासंदर्भातील वादांमध्ये न्यायालयीन दृष्टिकोन याविषयी मार्गदर्शन केले.
मालकी आणि कब्जा या वेगवेगळ्या कायदेशीर संकल्पना असून, अनेक वेळा एखाद्या व्यक्तीकडे मालकी हक्क नसतानाही कायद्याने संरक्षित असा कब्जा असू शकतो.
कब्जाधारक व्यक्तीचे हक्क, बेकायदेशीररीत्या कब्जा काढून घेण्याविरुद्ध उपलब्ध कायदेशीर संरक्षण, तसेच न्यायालयीन प्रक्रियेद्वारे हक्कांची अंमलबजावणी यासंदर्भात त्यांनी उपस्थितांना महत्त्वपूर्ण माहिती दिली.