राहुल गांधींचा भिवंडीत होणार मुक्काम..
भिवंडी ( भानुदास भसाळे )भिवंडी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवार हमखास विजयी होऊ शकतो म्हणून काँग्रेस पक्ष या जागेवर दावा करीत असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईच्या दिशेने जात असताना 15 मार्च रोजी त्यांचा मुक्काम भिवंडी येथे असणार आहे.या निमित्ताने मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडीतील सोनाळे गांव येथील सोनाळे क्रीडांगनाची पाहणी करण्याकरीता बाळासाहेब थोरात आले होते.

यावेळी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस विरेन दयानंद चोरघे,भिवंडी शहरध्यक्ष रशीद ताहीर मोमीन,तालुका अध्यक्ष विजय पाटील,पंकज गायकवाड,चेतन पवार यांचेसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक जागा वाटप संदर्भात महाविकास आघाडीतील तिढा अद्याप सुटला नाही.तसेच भिवंडी लोकसभेची जागा कळीचा मुद्दा ठरत आहे.भिवंडी लोकसभेचा जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (पवार) यांनी दावा केला आहे याबद्दल त्यांना पत्रकारांनी विचारले असता भिवंडी ची जागा काँग्रेस पक्ष लढविणार आहे. त्यावर पक्षाचा हक्क आहे.त्यामुळे याबाबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.महाविकास आघाडीत कोणा पक्षाला किती जागा वाट्याला येतील यापेक्षा कोण कोठे निवडून येईल ही बाब तपासून त्यावर भर दिला आहे.त्यामुळे आमचा आग्रह भिवंडी लोकसभा काँग्रेसला मिळावी असा आहे असे बाळासाहेब थोरात यांनी निक्षून सांगितले.राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा भिवंडीत दाखल झाल्या नंतर रात्रीचा मुक्काम सोनाळे क्रीडांगणा वर करण्याचा विचार काँग्रेस पक्षाकडून घेतला असून त्यासाठी सुरक्षित जागेची पाहणी केली जात आहे.दरम्यान पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे हे सध्या दिल्लीमध्ये ठाण मांडून बसले असून विविध नेत्यांच्या भेटी घेऊन उमेदवारी मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत.