मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना यांना दिले निवेदन
भिवंडी (शरद भसाळे ) भिवंडी सह ठाणे जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे भाजी पाला व फळ उत्पादक आणि वीटभट्टी
व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अवकाळी पावसासह झालेल्या वादळात शेतकरी वर्गासह अनेकांची घरे उध्वस्त झाली आहेत या सर्व
नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करून तातडीने भरीव नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी केली आहे.याबाबत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,कृषी मंत्री माणिकराव कोकाटे व ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना लेखी निवेदन दिले आहे.
चोरघे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ठाणे जिल्ह्यात 4 एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व वादळ वारा यामुळे भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच विटांचे नुकसान होऊन वीटभट्टी व्यवसाय धोक्यात आला आहे.तर भिवंडी, शहापूर, अंबाडी,मुरबाड अनगांव,वाडासह सह ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
महाराष्ट्र सरकार पिक कर्ज माफ करेल या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाहीच उलट अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्याचा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळण्याची गरज असून तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावून यावे असे निवेदनात दयानंद चोरघे यांनी म्हटले आहे.दरम्यान शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत न केल्यास काँग्रेस पक्षातर्फे जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी सरकारला दिला आहे.
