अवजड वाहन प्रवेशामुळे भिवंडीत वाहतूक कोंडीचा प्रश्न झाला गहन, प्रवेश बंदी कायद्याची अंमलबजावणी करावी

भिवंडी

वाहतूक पोलिस उपायुक्त यांना निवेदन

भिवंडी (शरद भसाळे) भिवंडी शहर आणि अंजुरफाटा मानकोली,कशेळी व खारबाव परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यामुळे प्रवासी नागरिकांसह नोकरदार वर्ग आणि शालेय विद्यार्थी,स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत.या वाहतूक कोंडी बाबतीत वाहतूक पोलीस योग्य पद्धतीने नियोजन करीत नाहीत तसेच या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनाची रेलचेल नियमबाह्य पद्धतीने सुरू असते त्यामुळे होणाऱ्या
वाहतूक कोंडी ला अवजड वाहन जबाबदार आहे.त्यांना सकाळी वर्दळीच्या वेळ असल्यामुळे प्रवेश बंदी करून कायद्याची अंमलबजावणी वाहतूक पोलिसांनी काटेकोरपणे करावी अशी मागणी भिवंडी महानगर पालिका नगरसेविका वनिता सुनील भगत यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी वाहतूक पोलिस उपाआयुक्त पंकज शिरसाठ यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले आहे.
भिवंडी शहर परिसरात वाहतुकीचे योग्य पद्धतीने नियोजन होत नसल्यामुळे महापौर नारायण चौधरी यांनी वाहतूक पोलीस व पालिका अधिकाऱ्यांची संयुक्तरीत्या नुकतीच बैठक घेऊन वाहतूक सुरळीत करणे बाबत चर्चा केली तसेच नियोजित वेळेमध्ये अवजड वाहनांची वाहतूक शहरांमध्ये नको अशी सूचनाही महापौर चौधरी यांनी पोलिसांना दिली होती मात्र असे असताना शहरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वालचेल सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
अवजड वाहनांना वर्दळीच्या सकाळी ८ ते रात्री ८ वाजताच्या वेळी प्रवेशबंदी असतानाही अंजूरफाटा व शहरातील मुख्यमार्गावर अवजड वाहनांना बेकायदेशीर प्रवेश दिला जात आहे.ज्यामुळे या मुंबई आग्रारोड मार्गांवर सदैव वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी,चाकरमानी,रुग्ण यांना करावा लागत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुनील भगत यांनी यावेळी दिली.सदर
मार्गावर वाहतूक पोलीस अवजड वाहन चालकां कडून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण करून प्रवेश देत असल्याचाही तक्रार त्यांनी पोलीस उपायुक्तांकडे केली आहे.अनेक अवजड वाहनांची तपासणी नावाखाली त्याठिकाणी पावत्या फाडून प्रवेश देत आहेत.अंजूरफाटा चौकामध्ये वाहने रस्त्यावर थांबवून या पावत्यांची तपासणी केली जाते.या संपूर्ण प्रक्रियेमुळे वाहतूक आणखी मंद होते व प्रचंड कोंडी निर्माण होते.सर्व सामान्य वाहन चालक वाहतूक नियमांचे पालन करूनही त्यांना वाहन कोंडी चा नाहक मनस्ताप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या प्रकारची या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच प्रवेश बंदीच्या वेळेत कोणत्याही अवजड वाहनाला प्रवेश दिला जाणार नाही याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी.सर्व चौकांत वाहतूक व्यवस्था बाबतीत प्रभावी वाहतूक नियोजन करून नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा दावा.
भविष्यात वाहतूक कोंडीची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी. अन्यथा नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनाच्या शेवटी नगरसेविका वनिता भगत यांनी दिला आहे.