भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहर परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर उभी असलेली वाहन चोरी करण्याचे प्रकार वाढत असल्याने पोलिसांनी या चोरट्यांना पकडण्यासाठी जोरदार मोर्चा बांधणी सुरू केली असतानाच भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांच्या विशेष पोलीस पथकाने वाहनांची चोरी करणाऱ्या दोघांना मोठ्या शिताफीने तपास करीत अटक केली आहे. त्यांच्या कडून त्यांनी चोरी केलेल्या दहा लाख रुपये किमतीच्या 11 रिक्षा धुळे येथून जप्त करीत अन्य सहा गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाणे येथे दाखल रिक्षा चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास भिवंडी गुन्हे शाखा पोलीस करीत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांचे पोलीस पथकाचे विजय कुंभार,अमोल इंगळे,भावेश घरत यांनी गुन्हयाचे घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कँमेरे तपासले असता चोरटे रिक्षा चोरी करुन जात असतानाचे आढळून आले.त्यामुळे त्यांचा मागोवा काढत गुन्हे शाखेचे पोलीस पथक थेट धुळे येथे दाखल झाले.तेथून गुन्हयातील चोरी झालेली रिक्षा व नारपोली पोलीस ठाणे येथून चोरीस गेलेली रिक्षा अशा दोन रिक्षा हस्तगत केल्या.या रिक्षा अरबाज अल्ताफ शहा वय २७ वर्षे,)
सोहेल उर्फ साहिल अल्ताफ शहा (वय ३० वर्षे,दोघे रा.तिरंगा चौक, धुळे) यांनी चोरी केल्याचे चौकशी तपासात निष्पन्न झाले.परंतु दोघे आरोपी फरार होते,पैकी आरोपी अरबाज अल्ताफ शहा हा भिवंडीत येणार असल्याची माहिती समजल्यावर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक
जनार्दन सोनावणे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक धनराज केदार, श्रीराज माळी,पोलिस उपनिरीक्षक रविंद्र पाटील,व पोलिस कर्मचारी सुनिल साळुंखे, सुदेश घाग,अमोल इंगळे,
भावेश घरत,विजय कुंभार या पोलीस पथकासह के.जी.एन.रोड चौक,60 फुट रोड, पाईपलाईन रोड, शांतीनगर या ठिकाणी सापळा रचून अरबाज अल्ताफ शहा यास ताब्यात घेत. त्याचे कडे चौकशी केली असता त्याला भिवंडीतील बिलाल नगर येथील आरिफ मोहम्मद हुसेन खान (वय २९ वर्षे) हा रिक्षा चोरी करुन विक्री करण्यासाठी देत असल्याचे सांगितले त्यामुळे पोलिसांनी आरिफ खान यास त्याच्या घरातुन ताब्यात घेतले.या दोघांकडून एकूण 10 लाख रुपये किमतीच्या 11 रिक्षा हस्तगत केल्या तसेच भिवंडी पोलिस उपाआयुक्त परिमंडळ क्षेत्रातील इतर सहा गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान गुन्हे शाखेकडून फरार सोहेल उर्फ साहिल अल्ताफ शहा याचा शोध पोलीस घेत असल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
