भिवंडी ( प्रतिनिधी ) तीव्र उन्हाळा चे झळा वाढू लागल्या असुन त्यामुळे शहर व ग्रामीण भागात पाणी टंचाई समस्या गंभीर बनत आहे. भिवंडी तालुक्यातील काही गावात आदिवासी पाड्यांवर पाणी उपलब्ध होत नसल्याने महिला व नागरिकांची मुबलक पाणी मिळवण्यासाठी फरफट होत आहे.याबाबत तक्रारी करून सुध्दा शासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थ नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून शासन व ठाणे जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी भर उन्हात श्रमजीवी संघटनेच्या कातकरी घटकाचे जिल्हाध्यक्ष जयेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ महिलांनी भिवंडी तालुक्यातील मालबीडी सूर्यानगर ग्रामपंचायती वर ” एका हाती हंडा ” एका हाती दांडा ” या मोर्चाचे आयोजन करून सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली.भूषण घोडविंदे,नवनाथ भोये, सुरेश रावते,इंद्रसेन ठाकरे,सागर जाधव, अक्षय वाघे यांच्या सह गावातील महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

भिवंडी तालुक्यातील विविध ग्रामपंचायत क्षेत्रात कोट्यावधी रुपये खर्च करून जलजिवन मिशन अंतर्गत हर घर नळ हर घर जल ही योजना शासनाने राबविण्यास घेतली.परंतु बहुतांश गावातील योजना आज ही अपूर्ण आहेत.तर अनेक गावातील कामे ठेकेदारांनी अत्यंत हलक्या दर्जाची कुचकामी ठरणारी केली असल्याने या योजनेचा बोजवारा उडाला आहे.भिवंडी तालुक्यातील मालबिडी सुर्यानगर या गावासाठी 2020 मध्ये पाणीपुरवठा योजना मंजूर झाली परंतु तीन वर्षाची मुदत संपून ही गावातील कुटुंबीयांना नळाद्वारे पाणी उपलब्ध झाले नसून बोअरवेल मधून सुध्दा उन्हाळ्यात पाणी येत नसल्याने गावातील कुटुंबीय तहानलेले आहेत अशी माहिती जयेंद्र गावित यांनी दिली.गावातील योजने अंतर्गत पाणी पाईप लाईन जमीनीवर अवघी एक फूट खोल असल्याने ती कधी ही उखडू शकते त्यामुळे
भिवंडी पंचायत समिती पाणीपुरवठा विभाग अधिकाऱ्यांनी
संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. गावात सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी उपाययोजना करावी या मागणी साठी
गावातील महिला एका हाती हंडा तर एका हाती दांडा असे अभिनव आंदोलन केल्याची माहिती गावित यांनी दिली.