दयानंद चोरघे व सुरेश म्हात्रे मध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघावर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केल्यामुळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी तीव्र नाराज झाले असून इच्छुक उमेदवारांमध्ये धडकी भरली आहे.भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा पारंपारिक मतदार संघ आहे त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय व प्रदेश अध्यक्षांकडे केली आहे.काँग्रेस पक्षाच्यावतीने दयानंद चोरघे व राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुरेश म्हात्रे या दोघांमध्ये
सध्या उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.त्यामुळे दोन्ही उमेदवार व पक्षात चुरस निर्माण झाली आहे.मात्र भिवंडी लोकसभा मतदारसंघा बाबतीत राष्ट्रीय व राज्य स्तरावर कोणत्याही प्रकारचा पक्षीय निर्णय झालेला नाही.त्यामुळे उमेदवारीचा तिढा कायम आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाने केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना उमेदवारी घोषित केल्यामुळे त्यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवून प्रचार सुरू केले आहेत.त्यामुळे काँग्रेस पक्षात
चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.भिवंडी मतदारसंघातून काँग्रेस पक्षाला सक्षम असा उमेदवार मिळत नसल्यामुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मतदार संघावर दावा करून हा मतदार संघ घेण्यासाठी खुद्द शरद पवार यांनी हालचाली सुरू केल्या आहेत त्यामुळे काँग्रेस पक्षांमध्ये धडकी भरली आहे.भिवंडी लोकसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षातर्फे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे,माजी खासदार सुरेश टावरे हे निवडणूक लढविण्या साठी इच्छुक आहेत.त्यामुळे त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांना लेखी पत्र देऊन उमेदवारी मागितली आहे.तर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक झाले असुन त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.या मतदार संघामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने निवडणुकीचे वारे जोमामध्ये वाहू लागले आहेत.केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी प्रचार यंत्रणा सुरू केली असून मतदारसंघांमधील प्रतिष्ठित नागरिक तसेच आजी-माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.भिवंडी लोकसभा मतदार संघातून दामोदर शिंगडा यांनी 6 वेळा तर सुरेश टावरे यांनी एकदा प्रतिनिधित्व केले आहे त्यामुळे या मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा हक्क आहे अशी माहिती पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे,भिवंडी शहरध्यक्ष रशिद ताहीर मोमीन, यांनी दिली.
