भिवंडी (भानुदास भसाळे ) ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवस सतत मुसळधार पाऊस पडल्याने अनेक भागात पुरजन्य परिस्थिती उद्भवली आहे.या पडलेल्या मुसळधार पावसाचे पाणी शेतात शिरून शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे, उभी पिके वाहून गेली आहेत.अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी,शहापूर, मुरबाड,कल्याण,अंबरनाथ तालुक्यातील शेतपिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.ठाणे जिल्ह्यातील सध्याची सर्व परिस्थिती पाहता ठाणे जिल्हाधिकारी व महसूल विभाग अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीने मदत द्यावी अशी मागणी ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी केली आहे.

ठाणे जिल्हाधिकारी यांना या संदर्भात दयानंद चोरघे यांनी याबाबत निवेदन दिले असून निवेदनात म्हटले आहे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी सह सर्वच तालुक्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे,जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात पीक घेतले जात असून आदिवासी पट्ट्यात नागलीचे पीक घेतले जाते या दोन्ही पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे,तर काही ठिकाणी शेतकऱ्याचे पशूधन वाहून गेले आहे.वाढत्या महागाईने आधीच संकटाचा सामना करत असलेल्या शेतकरी बळीराजाला निसर्गाने आणखी संकटात टाकले आहे.
राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी सरकारने या कठीण प्रसंगी सर्व नियम,अटी व शर्थी बाजूला ठेवून शेतकऱ्यांची मदत केली पाहिजे अशी मागणी निवेदनात जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी केली आहे. राज्यासह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी अशी मागणी ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी केली आहे.

