शहापूर – छत्रपती शिवाजी महाराजांवर गर्भसंस्कार झालेल्या ऐतिहासिक माहुली किल्ला परिसराचे रुप पालटणार असून, किल्ले पर्यटनाला चालना मिळणार आहे. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने शासनाकडून चार कोटी ८९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, किल्ल्याला पर्यटकांच्या दृष्टीकोनातून विविध कामे करण्यात येणार आहेत.केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी माहुली किल्ल्याच्या पायथ्याबरोबरच शहापूर तालुक्यातील शेणवा,वासिंद मळेगांव विविध कामांचे ठिकठिकाणी भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी भाजपाचे शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इरनक, तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, जि.प.चे माजी सदस्य काळुराम धनगर, रंजना उघडा, शहापूर शहराध्यक्ष विवेक नार्वेकर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा शीतल तोंडलीकर, पं.स.चे माजी सदस्य सुभाष हरड आदी उपस्थित होते.माहुली किल्ल्यावर मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र, किल्ला परिसरात पर्यटकांच्या दृष्टीकोनातून सुविधा नाहीत. या भागात पर्यटकांच्या सुविधा पुरविण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांपासून नव्या पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी सुशोभिकरणाची विविध कामे करण्यात येणार आहेत.त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकाराने या कामासाठी राज्य सरकारने ४ कोटी ८९ लाखांचा निधी मंजूर केला.विकास कामांमुळे पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होऊन, स्थानिक तरुणांनाही रोजगार मिळेल, अशी आशा केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केली.तसेच कपिल पाटील यांच्या खासदार निधीतून शेणवा येथे सामाजिक सभागृह, ३ कोटी २० लाख रुपये खर्चून नारायणगाव-कुडशेत-शिरगाव रस्ता, १० लाखांच्या मळेगाव-ठुणे-अष्टे रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. तर जिल्हा परिषदेच्या नारायणगाव शाळेसाठी २६ लाख रुपये खर्चून नवी इमारत आणि जल जीवन मिशनच्या माध्यमातून कुडशेत येथील १० लाखांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला शुभारंभ करण्यात आला.वासिंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या इमारतींचे भूमिपूजनही करण्यात आले.