भिवंडी (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पोलीस दलास दिले आहेत.त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असुन भिवंडीतील
निजामपूरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड व पोनि दीपक शेलार (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सशस्त्र दरोड्याच्या पूर्व तयारीत असलेल्या सराईत टोळीतील तिघांना पाठलाग करून जेरबंद केले आहे. या बाबतीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सुफियान भद्रे आलम अन्सारी (१९), सोहेल सनाउल्लाह शेख (२६), नईम जमाल अहमद सय्यद (१९ सर्व रा.भिवंडी) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
त्यांच्याकडून सखोल चौकशी करून ८ गुन्ह्यांची उकल करून ७८ हजार ८१० रुपये किमतीची विविध प्रकारची सशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.त्यांचे अन्य दोन साथीदार रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
भिवंडी पारोळ रस्त्यावरील तळवली नाका हद्दीत ५ ते ६ जण रिक्षातून सशस्त्र फिरत असल्याची माहिती सपोनि विनोद चव्हाण, पोउपनि जगदीश गीते,पोह मारुती भारती, सुशीलकुमार धोत्रे,नीलकंठ खडके, इब्राहिम शेख या पोलिस पथकाला
मिळाल्याने त्यांनी पोलीस उपआयुक्त श्रीकांत परोपकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त दिपक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस पथकाने तळवली नाका येथील स्मशनभूमी जवळील रस्त्यावर सापळा रचला होता.त्यावेळी संशयित ऑटो रिक्षा क्र.एमएच ०४ केएक्स ७१६३ भरधाव वेगात जाताना दिसली.
पोलिसांनी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला,मात्र संशयितांनी पळ काढला असता पोलिसांनी पाठलाग करून रिक्षा अडवली.त्यानंतर तिघांना ताब्यात घेऊन रिक्षाची झाडझडती करून अवैध देशी बनावटीचे अग्निशस्त्रे,जिवंत काडतूस व धारदार हत्यार असा एकूण ७८ हजार ८१० रुपये किमतीचा शस्त्र साधनसामग्री पोलिसांनी जप्त केली आहेत.याप्रकरणी निजामपूरा पोलिस ठाण्यात तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून त्यांच्या फरार साथीदारांचा शोध पोलिस घेत आहेत.आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांच्यावर भिवंडीतील ४ पोलिस ठाण्यां अंतर्गत ८ गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.तर यातील सुफीयानवर विविध गंभीर गुन्ह्यांमुळे हद्दपारीची कारवाई झाल्याचेही उघड झाले आहे.आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.पुढील तपास निजामपूर पोलीस ठाण्याचे वपोनि संतोष आव्हाड,पोनि दिपक शेलार करीत आहेत.
