भिवंडी ( बी.एस ) भिवंडी शहर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असुन शहर परिसरात खराब रस्त्यामुळे वाहतूक कोंडी चा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या सहा महिन्यापूर्वी डांबरीकरण करून पँच वर्क करून बनविण्यात आलेल्या शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. शहरातील विविध भागातील मुख्य व अंतर्गत रस्त्यां वर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात होत आहेत.गेल्या15 दिवसात 22 हुन अधिक मोटार
सायकलस्वार खराब रस्ते व खड्डयात पडून किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले.तसेच इतर वाहनाचे खड्डयात चाक आपटून नुकसान झाले आहे.महापालिका प्रशासनाकडे वाहतूक पोलीस व नागरिकांनी तक्रारी करू सुध्दा दुर्लक्ष केले जात असल्याने वाहन चालकां मध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय पक्षांचे पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी खराब रस्ते आणि खड्डे पडलेल्या रस्त्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
भिवंडी शहरातील धामणकर नाका,
कणेरी रोड,कल्याण नाका, दरगाह रोड,वंजारपट्टी नाका,गणेश सोसायटी फडतरे सदन रोड, बंगालपूरा,संत नामदेव महाराज पथ,ठाणगे आळी परिसर,कुंभार आळी रोड,कामतघर, ताडाळी,पद्मानगर अशा विविध भागातील रस्ते व मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी चा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहन चालवताना चालकांना येथील खड्ड्याचा अंदाज न आल्याने मोटारसायकलस्वार चालक या खड्ड्यां मध्ये पडून अपघात होत आहेत. विशेष करून रात्रीच्या वेळी हे अपघात होत आहेत.दोन दिवसांमध्ये या ठिकाणी 15 हून अधिक नागरीक आपल्या मोटर
सायकलीसह खडयांत पडले आहेत. तसेच अनेकदा मोठी वाहन या खड्डयात आदळून बंद पडत आहेत.
महापालिका प्रशासन या रस्त्यांवरील खड्ड्यां मध्ये मातीचा डबर टाकून खड्डे तात्पुरती भरून डागडुजी करण्याचा प्रयत्न करीत आहे.
मात्र पावसामुळे डबर माती वाहून जात असल्याने रस्त्यावर चिखल होत आहे. खराब रस्ते व खड्डेमय रस्त्यांबाबत राजकीय पक्षांचे पुढारी,
लोकप्रतिनिधी व माजी नगरसेवकांनी मूक भूमिका घेतल्यामुळे महापालिका प्रशासनही सुस्त झाले आहे.