भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी ठाणे महामार्गावरील रस्त्यावर सकाळच्या सुमारास ट्रक चालकावर हल्ला चढवत त्याला लुटणाऱ्या चार जणांच्या चौकडीस भिवंडी कोनगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करीत अवघ्या 24 तासात ताब्यात घेऊन अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून अद्याप काही गुन्हे उघडकीस येतात का याची सखोल चौकशी सुरू केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नाशिक मार्गावरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर 26 मार्च रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास टायर मधील हवा चेक करण्यासाठी ट्रक चालक खाली उतरला असता गाडी जवळ आलेल्या चार चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत ट्रक चालकाला लोखंडी सळई ने बेदम मारहाण करून त्याच्याकडील 4हजार 660 रुपये रोख रक्कम व आधार कार्ड, स्मार्ट कार्ड, अशा वस्तू जबरी चोरी करून पसार झाले होते.याबाबत ट्रक चालक यांनी भिवंडी कोनगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली त्यामुळे पोलिसांनी तातडीने दखल घेऊन अज्ञात चोरां विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोनगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशीकांत विश्वकार यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव चुंबळे व तपास पथकातील पोलिस कर्मचारी मधुकर घोडसरे,नरें पाटील,रमाकांत साळुंखे,राहुल वाकसे,हेमंत खडसरे, हेमराज पाटील,
अच्युत गायकवाड,कुशल जाधव यांनी सखोल चौकशी तपास करीत आरोपी शिवा नायक,निखिल कोरसे,संतोष राठोड व रवी गौड या चार सराईत चोरट्यांना 24 तासात ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्याची उकल करून जबरी चोरीतील सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांनी यश मिळविले आहे.सदर गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव चुंबळे हे करीत आहेत.