भिवंडी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी साठी २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी भा.का.क. महासंघ आग्रही..

भिवंडी

भिवंडी (शरद भसाळे) भिवंडी शहर महानगर पालिकेतील
अधिकारी आणि कर्मचारी यांना सालाबाद प्रमाणे सन २०२६ साला करीता कर्मचाऱ्यांना २०,०००/- (वीस हजार मात्र)दिवाळी सानुग्रह अनुदान रूपये मिळावेत अशी मागणी भारतीय कामगार कर्मचारी महासंघ युनियनचे अध्यक्ष भानुदास भसाळे, सचिव श्रीपत तांबे यांनी युनियनचे माध्यमातून महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्याकडे केली आहे. तसेच सन २०२२ मध्ये मंजूर झालेल्या सेवाशर्ती व आकृतीबंधातील १७ पदांची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत पदोन्नतीची प्रक्रिया राबवू नये,अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरवर्षी महानगर पालिकेचे प्रशासन आणि काही वरिष्ठ अधिकारी कामगार युनियन सोबत होत असलेल्या मिटींग मध्ये महानगरपालिकेची परिस्थिती बरोबर नाही,असे सांगून कामगारांच्या सानुग्रह अनुदानात कपात केली जाते. पालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद असताना देखील गेल्या वर्षी म्हणजे सन २०२५ या सालामध्ये म.न.पा. अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळी सानुग्रह अनुदान प्रत्येकी रूपये १४,५००/- मात्र देण्यात आले होते. परंतु या वर्षी महापालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे मालमत्ता कराची वसूली केल्याने म.न.पा ची परिस्थिती चांगली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली,यावर्षी महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाची रक्कम प्रत्येकी वीस हजार रुपये मिळावी,अशी मागणी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष भानुदास भसाळे आणि सचिव श्रीपत तांबे यांनी युनियनचेवतीने लेखी निवेदनपत्राव्दारे केली आहे.
तसेच भिवंडी शहर महानगरपालिकेचा सेवाशर्ती व आकृतीबंध सन २०२२ मध्ये मंजूर झालेला आहे. सदर मंजूर सेवाशर्ती व आकृती
बंधानुसार महानगर पालिकेतील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, सदर मंजूर आकृती
बंधातील १७ पदांमध्ये दुरुस्ती आवश्यक असल्याने सदरं पदांची दुरुस्ती करण्यासाठी प्रस्ताव संबंधित शासन स्तरावर पाठविण्यात आलेला आहे. सदर १७ पदांची दुरुस्ती शासनाकडून अद्याप मंजूर झालेली नसताना पदोन्नतीची प्रक्रिया राबविल्यास संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता,पात्रता व पदोन्नतीच्या हक्कांबाबत भविष्यात प्रशासकीय अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर १७ पदांची दुरुस्ती शासन स्तरावरून मंजूर होऊन सुधारित सेवाशर्ती व आकृतीबंध प्राप्त होईपर्यंत भिवंडी शहर महानगर पालिकेतील पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात येऊ नये आणि पदांची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत पदोन्नती प्रक्रिया स्थगित ठेवावी तसेच शासन स्तरावर दुरुस्ती करणे करिता पाठपुरावा करण्यात यावा,अशी मागणी देखील भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी निवेदनाव्दारे महापालिका आयुक्त अनमोल सागर व महापौर नारायण चौधरी यांच्याकडे केली आहे.