भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगरपालिकेत सुरू असलेल्या भ्रष्ट व गलथान कारभाराची तातडीने सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली होती मात्र त्याकडे राज्य शासन व पालिका आयुक्त प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या परशुराम पाल या इसमाने राज्य शासन व पोलिसांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज शुक्रवारी दुपारी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय इमारती समोरील रस्त्यावर पालिका मुर्दाबाद च्या घोषणा देत अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत या इसमाला पेट्रोल जन्य पदार्थासह ताब्यात घेतले आहे.

भिवंडी महानगर पालिकेच्यावतीने गतवर्षी पावसाळ्या गटार व नालेसफाई साठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्याचे दाखविण्यात आले.मात्र शहरात योग्य पद्धतीने गटार व नालेसफाई न झाल्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व दुकानदारांचे मोठे नुकसान झाले होते नालेसफाई झालेली नसताना सुद्धा पालिका आयुक्त प्रशासनाने ठेकेदारांना बील अदा केली.नालेसफाई कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व गलथान कारभार झाला आहे.या संदर्भात आयुक्त अजय वैद्य यांनी आरोग्य व स्वच्छता विभागातील संबंधित उपायुक्त व अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते परशुराम पाल यांनी केली होती.याबाबत लेखी निवेदन सुद्धा राज्य शासन व आयुक्तांना दिले होते मात्र त्याकडे सराईकपणे दुर्लक्ष करण्यात आले होते.नालेसफाई बाबतीत झालेल्या भ्रष्टाचारा बाबतीत राज्य शासन,पोलीस व आयुक्तांनी लक्ष द्यावे यासाठी पाल यांनी नागरिकांना सोबत घेऊन काही दिवसांपूर्वी लेखी तक्रार देऊन महापालिका कार्यालय समोर उपोषण सुध्दा केले होते.मात्र तरीसुद्धा आयुक्तांनी चौकशी न केल्याने संतप्त झालेल्या परशुराम पाल यांनी आज दुपारी महापालिका मुर्दाबाद च्या घोषणा देत पालिकेच्या मुख्य कार्यालयाचे इमारती समोर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला ही बाब उपस्थित पोलिसांनी पाहताच तात्काळ त्यांनी पाल यांना पकडून त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली काढून घेत त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन बसवले आहे.याबाबत पोलिसांनी समज नोटीस देत सोडून दिले आहे.