भिवंडीतील शेतकरी हवालदिल..
भिवंडी ( प्रतिनिधी ) पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा विरार – भिवंडी ते अलिबाग हा मल्टी मॉडेल कॉरिडोर महामार्ग रस्त्याचे काम वर्षभरापासून रखडले गेले आहे,त्यातच आता या महामार्ग रस्त्यात बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे,त्यामुळे हा महामार्ग होणार की नाही याबाबत भिवंडी तालुक्यातील स्थानिक रहिवासी शेतकऱ्यांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.या महामार्गासाठी भिवंडी तालुक्यातील रहिवासी व शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करणे संदर्भात शासन स्तरावरून रहिवासी नागरिकांना व शेतकऱ्यांना नोटिसा बजावत मोजणी काम सुरू झाले होते
मात्र गेल्या काही महिन्यांपासून रस्ता कामा संदर्भात कोणत्याही प्रकारची हालचाल शासनस्तर व एमएमआरडीए कडून होत नाही तसेच मोबदला देण्यात आलेला नाही तसेच या महामार्ग रस्ते कामात पुन्हा बदल होणार असल्याची जोरदार चर्चा ग्रामस्था मध्ये सुरू झाली आहे त्यामुळे भिवंडी तालुक्यातील शेतकरी व नागरिक हवालदिल झाले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बाबतीत लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

ठाणे जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या व वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र व शासन स्तरावरून एमएमआरडीएच्या माध्यमातून विरार – भिवंडी ते अलिबाग हा नवीन मल्टी मॉडेल कॉरिडोर रस्ता महामार्ग तयार करण्याचे काम मंजूर झाले आहे,126 किमी अंतराचा हा महामार्ग रस्ता सुमारे सहा ते 14 पदरी असून रायगड,ठाणे व पालघर अशा तीन जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख महामार्ग असणार आहे.विरार – भिवंडी – अलिबाग या ” मल्टी मॉडेल कॉरिडोर “महामार्गासाठी भिवंडी तालुक्यातील अलीमघर,हायवे दिवा, काल्हेर,कशेळी,केवणी दिवा, खारबाव, खारडी अशा विविध गावातून हा महामार्ग रस्ता तयार होणार असल्याने शासनस्तरावरून रहिवासी नागरिक व शेतकऱ्यांना जमिनीची मोजणी करून रस्ता भुसंपादन करणे बाबत नोटिसा देण्यात आले आहेत, मात्र बाधित शेतकऱ्यांना याबाबत कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्यात आलेला नसल्याची माहिती ग्रामस्थ शेतकरी देत आहेत तसेच रस्ते कामा संदर्भात कोणत्याही माहिती देण्यात आलेली नाही काम सुद्धा ठप्प आहे,त्यातच आता या महामार्गात बदल होण्याची चर्चा होत असल्याने हा महामार्ग होणार की नाही याबाबत शंका रहिवासी ग्रामस्थाकडून उपस्थित केली जात आहे,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी व स्थानिक ग्रामस्थां कडून करण्यात येत आहे.

मुंबई महानगरातील प्रवेश नियंत्रित असा हा पहिलाच महामार्ग असणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या विकासात विरार- भिवंडी ते अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर मोलाचा ठरणार आहे. या कॉरीडोअर मध्ये आठ इंटरचेंज, २८ वाहन अंडरपास, १६ पादचारी अंडरपास आणि १२० कल्व्हर्ट असतील. संपूर्ण मार्ग आठ पदरी असून त्यासाठी २१ उड्डाणपूल,पाच टनेल, ४० मोठे आणि ३२ छोटे पूल प्रस्तावित आहेत. हा मार्ग पूर्ण झाल्यावर परिसरातील ग्रोथ सेंटर,एमआयडीसी आणि वसई-विरार, ठाणे,कल्याण-
डोंबिवली,भिवंडी, नवी मुंबई, उरण-पनवेल या महानगरांसह जवाहरलाल नेहरू पोर्ट,नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास त्याचा मोठा लाभ होणार असून येथील प्रवासी आणि अवजड वाहतूक वेगवान होण्यास मदत होणार आहे. या मार्गामधोमध १३६ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारण्याचे ही प्रस्तावित आहे. विरार- भिवंडी अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर एमएमआरडीए कडून एमएसआरडीसीकडे सोपविल्याने महामंडळास तो समृद्धी महामार्गासह प्रस्तावित कोकण एक्स्प्रेस वे सह जेएनपीटीला जोडता येणे सोपे झाले आहे. सध्या समृद्धी महामार्गाची जेएनपीटीला जोडणी नसल्याने एमएसआरडीसीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुंबई-वडोदरा महामार्गावर अवलंबून राहावे लागत आहे. विरार – भिवंडी अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर हा समृद्धी आणि कोकण एक्स्प्रेस वे ला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. याशिवाय मुंबई-
अहमदाबाद, मुंबई-
पुणे एक्स्प्रेस वे, जेएनपीटी ते मुंबई-गोवा-पुणे यांना जोडणारा एनच-४ बी या महामार्गांना तो जोडण्यात येणार आहे.