भिवंडीतील कचरा उचलण्यात कुचराई  करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका अखेर रद्द ,नव्या ठेकेदार शोध सुरू..

भिवंडी



भिवंडी ( प्रतिनिधी )  भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील दररोज जमा होणारा शेकडो टन कचरा उचलण्यासाठी नेमलेल्या ठेकेदारा कडून टाळाटाळ केली जात होती. ठेकेदाराकडून काम होत असलेल्या कुचराई मुळे शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. शहरात मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर तसेच शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असल्याने पालिकेच्या स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला असल्याने अखेर पालिका आयुक्त प्रशासनाने ठेकेदार यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून येत्या 29 फेब्रुवारी पासून ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात आला असून नव्या ठेकेदार नियुक्तीसाठी प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिली आहे.
भिवंडी महानगर पालिका कार्यक्षेत्रात दररोज जमा होणारा सुमारे 250 हुन अधिक टन कचरा शहरातून उचलून डंपिंग ग्राउंड येथे वाहतूक करण्यासाठी मे 2022 मध्ये बोरीवली मुंबई येथील आर अँड बी इन्फ्रा या कंपनीस 1 हजार 229 रुपये प्रती टन दराने कचरा संकलनाचा ठेका दिला होता.त्यासोबत पालिकेने स्वतः 5 कोटी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या 50 घंटागाड्या व 23 कॉम्प्रेसर कचरा संकलीत  करणाऱ्या गाड्या नाममात्र एक रुपया दराने भाड्याने दिल्या होत्या.या ठेकेदाराच्या बिलापोटी महापालिका महिन्याला सुमारे पावणे दोन कोटी रुपये खर्च करत होती. मात्र असे असतानाही कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराने कामात हलगर्जीपणा केल्याने शहरात कचरा समस्या गंभीर बनली आहे.शहरात सतत कचरा प्रश्न निर्माण झाल्याने मनपा आयुक्त वैद्य यांनी कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराला साठ दिवसांची अंतिम नोटीस बजावली होती.या अंतिम नोटीस ची मुदत 12 फेब्रुवारी रोजी समाप्त झाली आहे.
त्यामुळे पालिका प्रशासनाने नव्या ठेकेदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती पालिका आयुक्त वैद्य यांनी दिली आहे. शहरातील कचरा उचलणाऱ्या ठेकेदारास कोट्यावधी रुपये देऊन ही शहरातील कचरा उचलला जात नसल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत होते. त्यामुळे नागरिकांना त्याचा भयंकर त्रास सहन करावा लागत आहे.29 फेब्रुवारी पासून ठेकेदाराचा कचरा उचलण्याचा ठेका रद्द होणार आहे.त्यामुळे शहरातील कचरा समस्या गंभीर बनणार असल्याने मनपा प्रशासना कडून आपल्या कर्मचाऱ्यांकडून स्वतःच शहरातील कचरा उचलण्यास सुरुवात केली आहे.पालिकेच्या 
आरोग्य व स्वच्छता विभागाचेवतीने दहा भाड्याचे डंपर घेऊन शहरातील कचरा उचलत आहेत. डंपरच्या भाड्याचे पैसे ठेकेदाराच्या देयकातून दिले जाणार आहेत अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. महापालिका कचरा उचलण्यात स्वतः सक्षम असताना मनपा प्रशासनाने आपल्याच गाड्या ठेकेदाराला एक रुपया भाड्याने देऊन पालिकेच्या गाड्यांचे नुकसान करून घेतले आहे. याबाबत राज्य शासनाने सखोल चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *