————-
टोल वसुली ची चौकशी करण्याची केली मागणी.
भिवंडी (प्रतिनिधी ) मुंबई नाशिक या महामार्गावर सुरू असलेले रस्ता रुंदीकरण व खराब झालेल्या रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.हा रस्ता दुरुस्त करणे कंत्राटदाराचे काम आहे, मात्र त्याकडे शासकीय अधिकारी व कंत्राटदार दुर्लक्ष करीत असल्याने या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी चा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.असेअसताना या महामार्गावर असलेल्या टोल कंपनीकडून मोठ्या प्रमाणात टोल वसुली सुरू आहे.शासन स्तरावर तक्रारी करून सुध्दा दुर्लक्ष केले जात आहे.
राष्ट्रीय महामार्ग-3 या रस्त्याची दुरवस्था झाली आहे’, असे म्हणत भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश (बाळामामा) म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली आहे.
त्यांच्या जनहित याचिकेवर प्राथमिक सुनावणी घेतल्यानंतर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केंद्र व राज्य सरकारच्या प्रशासनांना नोटीस जारी करून पुढील सुनावणी १ऑगस्टला ठेवली आहे. खासदार म्हात्रे यांनी न्यायालयात धाव घेतल्याने कंत्राटदार व राजकीय गटात प्रचंड खळबळ माजली आहे.सरकारी अधिकारी व कंत्राटदारांमध्ये साटेलोटे असल्याने आणि भ्रष्टाचार होत असल्याने मुंबई –
नाशिक रस्त्याच्या समस्या वर्षानुवर्षे कायम असल्याची माहिती खा.सुरेश म्हात्रे यांनी दिली.तसेच टोल वसुली संदर्भात मोठा गलथान कारभार सुरू आहे त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुंबई नाशिक भिवंडी बायपास महामार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवासी नागरिकांसह व्यापारी,विद्यार्थी व नोकरदार महिला वर्गाला वाहतूक कोंडी चा प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या महामार्गावरील रस्त्यावर जागोजागी खड्डे असल्याने कसारा-भिवंडीदरम्यान बसगाड्या सह इतर अडकून पडण्याचे प्रकार वारंवार घडत असतात.परिणामी विद्यार्थी, नोकरदार, शिक्षक अशा सर्व घटकांचे, वाहनधारकांचे खूप नुकसान होते.कित्येकांना
हॉस्पिटल,शासकीय कार्यालय व विमानतळावर वेळेत पाहोचणे शक्य होत नाही.खराब रस्त्यावर वारंवार अपघाताच्या घटनाही घडत आहेत.
खराब रस्त्याचा त्रास माजिवडा-कल्याण,भिवंडी बायपास रोड ते माणकोली या पट्ट्यात नागरिक व वाहनधारकांना सर्वाधिक त्रास होतो. शिवाय खराब रस्त्यामुळे वाहतूक कोंडीचा जाच तर नेहमीचाच झाला आहे.पडघा ते वाशिंददरम्यान नियमित प्रवास करणाऱ्यांचेही खूप हाल होतात’, असे म्हात्रे यांनी अँड.
श्यामऋषी पाठक यांच्यामार्फत केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
वाहतूक कोंडी व खराब रस्ता संदर्भात पोलीस व शासन प्रशासनांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत अशी माहिती खा.सुरेश म्हात्रे यांनी दिली.
चौकट
मुंबई ते नाशिकद रम्यानचा राष्ट्रीय महामार्ग चांगला राखण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावेत अशी विनंती खा.म्हात्रे यांनी केली आहे. हा रस्ता खराब असूनही टोलवसुली करणाऱ्या कंपनीकडून सार्वजनिक पैशांचा गैरवापर होत असल्याबद्दल एसआयटी चौकशीचे निर्देश द्यावेतअशी मागणी त्यांनी केली आहे.या मार्गावरील पडघा – अर्जुनाली टोलनाका येथे सार्वजनिक स्वच्छतागृहे व अन्य सुविधा देण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.या टोलनाक्यावर करण्यात आलेल्या टोलवसुलीचे ऑडिट करून अहवाल देण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.या महामार्ग रस्त्याची झालेली दुरावस्था व टोलनाक्यावर सुरू असलेल्या गलथान कारभारा संदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणली होती.तसेच,चांगला रस्ता उपलब्ध केला जाईपर्यंत टोलवसुली थांबवण्याची विनंती केली होती. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते.तरीही काहीच ठोस झाले नाही. शिवाय टोलवसुली करणाऱ्या कंपनी कडून टोलवसुलीच्या आकडेवारीविषयी लपवाछपवी करण्यात येत आहे. म्हणून ही याचिका करावी लागली आहे’, असे ही खासदार म्हात्रे यांनी याचिकेत म्हटले आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालय, राज्य सरकार, भिवंडी उपविभागीय अधिकारी, ठाणे पोलिस आयुक्त आदींना त्यांनी याचिकेत प्रतिवादी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

