भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगरपालिकेतील प्रभाग समिती क्र.१ ते ५च्या झोपडपट्टी भूभाग विभागातील ९ कर्मचारी यांना महापालिका प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस न बजावता त्यांना १८ मार्च २०२६ पासून तडका फडकी निलंबित केलेले आहे. त्यामुळे कर्मचारी मोठ्या प्रमाणात तीव्र नाराज झाले आहेत.
या प्रकरणी भारतीय कामगार कर्मचारी महासंघ,भिवंडी युनिट तर्फे लेखी पत्र देऊन चर्चा करण्यात आली. तसेच महापौर नारायण चौधरी यांनी सुध्दा या संदर्भात पालिकेचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने निर्णय घेणे आवश्यक आहे. याबाबत लेखी पत्र दिले
मात्र महापालिका आयुक्त प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने भारतीय कामगार कर्मचारी महासंघ युनियनच्या कामगारांनी काल शनिवारपसून काळ्याफिती लावून काम सुरु केले आहे, महापालिकेतील नऊ कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याप्रकरणी भारतीय कामगार कर्मचारी महासंघ, भिवंडी युनिटचे सचिव श्रीपत तांबे व अध्यक्ष भानुदास भसाळे या
पदाधिकाऱ्यांनी दि.१८/०३/२०२६ रोजी पालिका प्रशासनाला पत्र दिले होते.

त्या पत्रानुसार महापौर व आयुक्त यांच्यासोबत चर्चा झाली. तरी सुध्दा त्यांनी अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारे निर्णय घेतलेला नाही. म्हणून दि.२३/०३/२०२६ रोजी महापौर नारायण चौधरी यांच्या दालनांत युनियन पदाधिकारी व सदस्यांची चर्चा झाली. मात्र पाच दिवस झाले तरी निर्णय झाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. परिणामी महासंघाने प्रशासनास स्मरणपत्र देत ता..२८/०३/२०२६ पासून प्रभाग समिती क्र.१ ते ५ सर्व वसूली कर्मचारी यांनी ता.०५/०४/२०२६ पर्यंत पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निषेध करीत काळ्याफिती लावून वसुलीचे काम सुरु ठेवले आहे. या कालावधीमध्ये ता.०४/०४/२०२६ पर्यंत महापालिका आयुक्त प्रशासनाने योग्य पर्यायी मार्ग म्हणून निर्णय घेतला नाही, तर ता.०६/०४/२०२६ पासून महापालिकेसमोर दररोज सकाळी १०.०० ते सायं. ०६.०० वाजेपर्यात भारतीय कामगार कर्मचारी महासंघ कर्मचाऱ्यांसोबत बेमुदत साखळी उपोषण सुरु करणार असल्याचा इशारा पालिका आयुक्त प्रशासनाला लेखी निवेदन देत दिला आहे.
तसेच प्रभाग समिती क्र.१ ते ५ झोपडपट्टी विभागातील ९ प्रभाग लिपीकांना ता.१८/०३/२०२६ पासून निलंबित केल्याने महापालिकेचे सुमारे अडीच ते तीन कोटी रूपयाचे नुकसान झालेले आहे. याला जबाबदार उप आयुक्त (कर) विभाग व उप आयुक्त (सामान्य प्रशासन) हे जबाबदार आहेत. तरी हि रक्कम त्यांच्या कडून वसूल करण्यांत यावी,अशी मागणी भारतीय कामगार कर्मचारी महासंघ, भिवंडी युनिटचे अध्यक्ष भानुदास भसाळे, सचिव श्रीपत तांबे यांच्यावतीने आयुक्तांकडे लेखी निवेदन सादर करून करण्यात आली आहे.

