भिवंडी पालिका अर्थसंकल्पावर चर्चा, मालमत्ता कर घनकचरा विषयावर नगरसेवक आयुक्तप्रशासनावर नाराज…

भिवंडी

टोरंट पावर थकबाकी वसुलीसाठी नगरसेवक आक्रमक..?

भिवंडी ( प्रतिनिधी) भिवंडी शहर महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी पालिका सभागृहात महापौर नारायण चौधरी यांना काही दिवसांपूर्वी सादर केलेल्या ११७९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आज सोमवार ३० मार्च रोजी आयोजित केलेल्या विशेष महासभेत काही नगरसेवकांनी मालमत्ता कर वसुली व घन कचरा व्यवस्थापन या विषयावर चर्चा करून आयुक्त प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त केली.मालमत्ता कर वसुली अत्यल्प होत असून अनेक मालमत्तांची दुबार नोंदी,न आढळलेल्या मालमत्ता यामुळे थकबाकीचा फुगवटा वाढला आहे.अनेक मालमत्ता अनधिकृत असताना त्यांना असेसमेंट करता का,करताना अशा मालमत्तांवर ५ पट नव्हे तर ५० पट दंड आकारणी करा जेणे करून अनधिकृत बांधकामांना आळा बसेल असे मत तज्ञ नगरसेवकांनी व्यक्त केले.व्यावसायिक रीतसर परवानगी घेऊन बांधकाम करतील त्यासाठी एक खिडकी योजना राबवा अशी मागणी या चर्चे मध्ये सहभागी उपस्थितीत नगरसेवक फराज बाहुद्दीन,कमलाकर पाटील,अँड वैभव भोईर,जावेद दळवी या सदस्यांनी सहभाग घेतला.शहरात भगवान महावीर जयंती व धार्मिक उत्सव होत असताना विशेष स्वच्छता होत नसल्याने नगरसेवक अँड. वैभव भोईर,रोमा आळशी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
तर मल कर व जल कर अधिभार हा मोठ्या प्रमाणावर घरपट्टी सह आकारला असल्याची तक्रार फराज बाहुद्दीन यांनी केली.यावर उपायुक्त बाळकृष्ण क्षीरसागर यांनी मालमत्ता कर वसुली साठी सुसूत्रता यावी दुबार व वादग्रस्त नोंद असलेल्या मालमत्तांचा शोध घेण्यासाठी जी एस आय सर्वेक्षण केले जात असल्याची माहिती देत त्या माध्यमातून महापालिका उत्पन्न वाढीस मदत होणार असल्याचे सांगितले.
पोगाव भागात औद्योगिक क्षेत्र आहे .त्या लगत मोठ्या प्रमाणावर लॉजेस्टिक क्षेत्र विकसित झाले असताना पोगाव भागात पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून झोपडा नंबर देऊन अनधिकृत बांधकामांना पाठबळ दिले जात आहे असा आरोप नगरसेवकांनी केला त्यामुळे
संबंधिती प्रभाग समितीच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या मदतीने निष्कर्षण कारवाई करण्याचे निर्देश उपायुक्त विक्रम दराडे यांनी दिले.
घन कचरा व शहरातील कचरा उचलण्या साठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात असले तरी शहर अस्वच्छ राहत असल्याची तक्रार अनेक सदस्यांनी केली. यावर उपायुक्त विक्रम दराडे यांनी ८५ टक्के कचरा उचलला जात असल्याची माहिती सभागृहस दिली.त्यास अनेकांनी आक्षेप घेत अनेक भागात घंटागाड्या येत नसताना त्यांना काम केल्याचे पैसे दिले जात आहेत.अनेक भागात घंटागाड्या यांचे जी पी एस दुचाकीवर अँक्टिव ठेवून धूळफेक केली जात असल्याचा आरोप नगरसेवक यांनी केला.गाडी खराब झाली असे कारण देत काही भागात घंटागाडी तीन चार दिवस येत नाही त्यामुळे अनेक भागात कचऱ्याचे ठीग साचले असल्याचे नमूद केले.
अजमेर नगर साईप्रसन्न सोसायटी येथील डोंगर परिसरातील उंचा वरील घरांमधील कचरा संकलन घंटागाडी करीत नाही.किमान या भागात घरोघरी कचरा संकलन करावे अशी मागणी नगरसेवक संदीप भोईर यांनी केली.नगरपालिका असताना २४०० सफाई कामगार होते आज ती संख्या १५४६ वर येऊन ठेपली आहे .वारसा हक्काने लागणारा कामगार कार्यालयात टेबलावर काम करत बसला तर सफाई कोण करणार असा सवाल करीत ,सर्व सफाई कर्मचारी पदी नियुक्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सफाई कामावर लावण्याची मागणी यावेळी नगरसेवकांनी केली.
तर महापौर यांनी यापुढे घंटागाडी ठेकेदारांचे बिल स्थानिक नगरसेवकाने काम झाल्याचे शिफारस पत्र दिल्याशिवाय दिले जाणार नसल्याचे घोषित केले.तर सतत गैरहजर असणाऱ्या कामगारांवर बडतर्फीची कारवाई पालिका प्रशासन करणार असल्याची घोषणा करीत सर्व नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात किती सफाई कर्मचारी नियुक्त असल्याची माहिती दिली जाणार असून त्यांनी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केलेल्या तक्रारीनंतर नक्कीच कारवाई केली जाईल असा शब्द आयुक्त अनमोल सागर यांनी दिला.

टोरंट पॉवर कडील थकित २८० कोटी वसूल करावे…
टोरंट पॉवर कंपनीच्या २८० कोटी थकीत मालमत्ता कराचा मुद्दा
न्यायप्रविष्ट आहे.या मुद्द्यावर पालिकेने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी चांगल्या विधिज्ञ यांचे पॅनल उभे केले पाहिजे अशी मागणी करण्यात आली. मोबाईल टॉवर वरील थकित ४३ कोटी रुपयांचे मालमत्ता कर कशी वसूल करता येईल या साठी प्रयत्न करण्याची गरज असल्याची मागणी कमलाकर पाटील यांनी केली.