रमजानपूर्वी भिवंडी महापौर पदाची निवडणूक घ्या – आ.रईस शेख

भिवंडी


विलंबामुळे राजकीय घोडेबाजाराला चालना, लोकशाहीला धोका असल्याचे मत…

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी-निजामपूर महानगर पालिकेतील महापौर निवडणुकीला होत असलेल्या दीर्घ विलंबाबाबत चिंता व्यक्त करीत भिवंडी पुर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी ” रमजान ” पूर्वी महापौर निवडणूक  घेण्यात यावी अशी मागणी कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
महापौर निवडणुकी बाबतीत सतत होत असलेला विलंब राजकीय घोडेबाजाराला चालना देत असून लोकशाहीचे नुकसान करत असल्याचे मत आमदार शेख यांनी व्यक्त केले आहे. मुस्लिम समाज बांधवाचा पवित्र रमजान महिना येत्या १८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्यामुळे महापौर पदाची निवडणुकीची तारीख तातडीने जाहीर करावी अशी मागणी आ. शेख यांनी केली आहे.
महापौर निवडणुकीला होत असलेल्या विलंबामुळे लोकशाही मूल्यांना धोका निर्माण होत असल्याचा इशाराही त्यांनी दिला. महापौर पदाची निवडणुकीची तारीख जाहीर व्हावी यासाठी मी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे.मात्र ही प्रक्रिया अनावश्यकपणे लांबली आहे असे त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी या गंभीर मुद्द्याकडे तातडीने लक्ष देतील आणि आवश्यक ती कारवाई करतील असा विश्वास व्यक्त केला.