गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाईभिवंडीत २ कोटी रुपयांचे बेकायदेशीर अन्न पदार्थ जप्त..

भिवंडी

भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील अर्जुनली येथील मे.डीएक्सपी व्हेंचर इंडिया प्रा.ली.यांच्या गोदाम -आस्थापनेवर धडक तपासणी व छापेमारी करण्यात असता अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगवरील अत्यंत महत्त्वाच्या माहितीमध्ये कथित फेरफार करण्याची गंभीर बाब ठाणे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपासात समोर आली. सदर ठिकाणी आयात अन्नपदार्थांवरील मूळ उत्पादन तारीख, कालबाह्यता तारीख तसेच कमाल किरकोळ विक्री किंमत (एमआरपी ) पुसून – मिटवून टाकण्यासाठी थिनर या रासायनिक पदार्थाचा वापर होत होता. त्यानंतर सुधारित तारीख व एमआरपी पुन्हा छापण्याची अथवा स्टॅम्पिंग करण्यात येत होते. याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे विभाग-१० चे सहायक आयुक्त योगेश ढाणे
सह आयुक्त (अन्न) डॉ. सचिन जाधव अन्न सुरक्षा अधिकारी के. वाय. चिपळूणकर व ए. व्ही. कांडेलकर यांच्या
विशेष पथकाद्वारे कारवाई करीत २ कोटी रुपयांचे बेकायदेशीर अन्नपदार्थ जप्त करीत त्यांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.


अशा प्रकारे अन्नसाठ्याच्या गोदामात सुरु असलेल्या गैरकृत्यामुळे उत्पादनाची खरी ओळख, शेल्फ-लाईफ, कालबाह्यता स्थिती आणि ग्राहकाने किंमत व उत्पादनाविषयी घेतलेला निर्णय यावर परिणाम होऊ शकतो. उत्पादन तारीख किंवा कालबाह्यता तारीख बदलल्यास ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता तर असतेच, शिवाय अन्नपदार्थांच्या मागोवा घेणे, साठा नियंत्रण, तक्रारींची चौकशी आणि गरज भासल्यास बाजारातून उत्पादन परत मागविणे, यांसारख्या महत्त्वाच्या अन्नसुरक्षा प्रक्रियांनाही बाधा पोहोचू शकते. प्रशासन या प्रकरणातील प्रत्येक बाबीची कागदपत्रे, साठा, लेबल प्रिंटींग स्टॅम्पिंग प्रक्रिया व संबंधित पुरावा यांच्या आधारे अधिकारी पुढील तपास करीत आहे.
या कारवाई दरम्यान स्पार्कलिंग वॉटर, एनर्जी ड्रिंक, सौदी कॉकटेल, सोडा, प्रीमियम सोडा वॉटर, जिंजर सोडा तसेच ए२ बिलोना देशी तूप यांसह एकूण १४ प्रकारचे अन्नपदार्थ मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले. उपलब्ध जप्ती तपशीलानुसार या साठ्याचे घोषित एकूण मूल्य रु.२ कोटी ०६ लाख २१ हजार २४३ रुपये आहे. जप्त मालामध्ये विविध बँडचे पेय पदार्थ आणि देशी तुपाचे प्रकार समाविष्ट असून, संबंधित साठा नियामक नियंत्रणाखाली ठेवण्यात आला आहे. जप्त केलेल्या अन्नपदार्थांची संख्या, उत्पादननिहाय तपशील, पॅकिंग, लेबलवरील घोषणांमधील स्थिती आणि संबंधित नोंदींची पुढील पडताळणी करण्यात येत आहे.
घटनास्थळी तारीख व एमआरपी छापण्यासाठी वापरली जाणारी थिनर,स्टॅम्पिंग यंत्रसामग्री आणि संबंधित साहित्य आढळल्याने अन्नपदार्थांच्या लेबलवरील अनिवार्य घोषणांमध्ये अनधिकृत फेरफार झाल्याचे आढळून आले. भिवंडी ग्रामीण ठाणे येथे अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे विभाग-१० चे सक्षम परवाना प्राधिकारी तथा सहायक आयुक्त योगेश ढाणे यांना प्राप्त विशिष्ट गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक १८ व १९ नोव्हेंबर २०२६ रोजी मे. डीएक्सपी व्हेंचर इंडिया प्रा.ली.यांच्या गोदाम/आस्थापनेवर धडक तपासणी व छापेमारी करण्यात आली. तसेच तपासातील गंभीर बाबी, साठ्याची स्थिती आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपायांचा विचार करून सहायक आयुक्त योगेश ढाणे यांनी गुरुवार १९ नोव्हेंबर रोजी मे.डीएक्सपी व्हेंचर इंडिया प्रा.ली. यांचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित केला आहे. परवाना निलंबनाची कारवाई ही सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षणासाठी आणि तपास पूर्ण होईपर्यंत संभाव्य जोखीम रोखण्यासाठी करण्यात आलेली प्रशासकीय प्रतिबंधात्मक कारवाई आहे.