भिवंडी ( प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी नुसार साजरी होणारी शिवजयंती भिवंडी शहर परिसरात मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.या निमित्त शहरातील ठिकठिकाणी शिवचरित्रावर आधारीत भव्य देखावे उभारण्यात आले होते.कोंबडपाडा शिवसेना शाखा,टिळक चौक,कामतघर,वाणी आळी,कासार आळी, काप आळी, पद्मा नगर, ब्राह्मणाळी,शिवाजी नगर,नवीचाळ,कुंभार आळी,खोणी गांव या भागातून विशेष सजावट करून शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.यावेळी पोलिसांनी सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

शिवजयंती निमित्त मुख्य मिरवणूक सायंकाळी 5:30 वा.सुरु झाली ज्यामध्ये चित्ररथ,देखावे सहभागी झाले होते. शिवाजी नगर येथून सुरु झालेल्या मिरवणुकीत उत्सव समितीचे अध्यक्ष माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या सह मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्या नंतर वाजत गाजत भव्यदिव्य मिरवणुकीस प्रारंभ झालं.आमदार महेश चौघुले, शिवसेना शहरप्रमुख सुभाष माने याच्या सह मान्यवर विविध पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.शोभायात्रेत ढोलताशा,लेझीम पथकासह तराफा नृत्य,पारंपरिक खेळ सादर करीत होते.या मिरवणुकीत विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी,मुस्लिम समाज बांधवासह मोठ्या संख्यने शिवप्रेमी नागरिक,महिला वर्ग सहभागी झाल्या होत्या.शिवाजी नगर,नवीचाळ, प्रभु आळी मंडई,बाजारपेठ,वाणीआळी, टिळक चौक,कासार आळी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास उत्सव समितीचे अध्यक्ष रुपेश म्हात्रे,डॉ.अक्षता तरे अदि मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तर कोंबडपाडा शिवसेना शाखा येथे विभाग प्रमुख किसन काठवले यांच्या पुढाकाराने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज उत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार शरद भसाळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांनी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला होता.