भिवंडी ( प्रतिनिधी ) ठाणे जिल्ह्यात नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुक प्रचाराचे वारे जोमात वाहत आहेत. उमेदवारांच्या मुलाखती व बैठका जोमात सुरू आहेत असे असताना काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी आज अचानकपणे आपल्या जिल्हाध्यक्ष पद व काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे पक्षाला मोठे खिंडार पडले असुन पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी आणि उमेदवारा मध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.त्यांनी दिलेल्या राजिनामा पत्रामुळे आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारावर होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
बिहार मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारून पराभव झाला असतानाच आता महाराष्ट्र व ठाणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला गळती लागली असुन जिल्हाध्यक्ष चोरघे यांनी तडकाफडकी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यात जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांचा सिंहाचा वाटा आहे.काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या आग्रहास्तव त्यांनी भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.आगामी होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद तसेच शहापूर, मुरबाड, भिवंडी ग्रामीण, अंबरनाथ बदलापूर निवडणूक अनुषंगाने चोरघे यांनी महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार पक्षातील पदाधिकाऱ्यांचे नियुक्त्या करून निवडणुकीसाठी जोरदार मोर्चा बांधणी सुरू केली होती.
तसेच इच्छुक उमेदवारांच्या बैठका व मुलाखती घेऊन निवडणुकीची तयारी सुरू केली असतानाच आज अचानकपणे दयानंद चोरघे यांनी
वैयक्तिक कारण पुढे करून काँग्रेस पक्षाचा सदस्य पद व ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले. पक्षाचे प्रदेशध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पाठविलेल्या लेखी पत्रात त्यांनी नमुद केले आहे कि
ठाणे जिल्हा ग्रामीण कॉग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून आता पर्यंत कार्यरत होतो. माझ्या वैयक्तिक कारणात्सव मी जिल्हाध्यक्ष पदाचा व काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वचा राजीनामा देत आहे.तरी सदर राजीनामा मंजूर करणार यावा अशी विनंती दयानंद चोरघे यांनी केली आहे. चोरघे यांनी घेतले या निर्णयामुळे काँग्रेस पक्षातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते तीव्र नाराज झाले असुन ते सुध्दा पक्षाच्या सदस्य व पदाचा राजिनामा देणार असल्याचे सांगितले.त्यामुळे आगामी होणाऱ्या निवडणुकीवर जबरदस्त परिणाम होणार असल्याची चर्चा ठाणे जिल्ह्यात सुरू झाली आहे.

