दिड लाखाहून अधिक मतदार वाढले..
भिवंडी ( प्रतिनिधी ) राज्यात नगरपंचायत, नगरपालिका निवडणूकाची प्रचार रणधुमाळी जोमात सुरू झाली आहे लागोपाठ आता जिल्हा परिषद,
पंचायत समिती व महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या तारखा जाहीर अद्याप झालेल्या नाहीत मात्र राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी अंदाज व्यक्त केल्याने पडघम वाजत आहेत.भिवंडी महापालिका प्रशासनाने प्रारूप विभाग रचना आराखडा व आरक्षण सोडत काढून निवडणुकीची तयारी महापालिका आयुक्त अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली आहे.
महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी साठी निवडणूक आयोग आदेशानुसार आज गुरुवारी (दि.20) प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आल्याची माहिती भिवंडी महापालिका निवडणुक विभागाचे प्रमुख अजित महाडीक यांनी दिली.त्यामुळे महापालिकेच्या मुख्य कार्यालय व प्रभाग समिती कार्यालयात राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार व नगरसेवक यांनी आपल्या समर्थका सोबत यादी पाहण्यासाठी गर्दी केली होती.
भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रातील २३ प्रभागात सुमारे सहा लाख ६९ हजार ३३ एकूण मतदार हे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करणार आहेत.
यामध्ये तीन लाख ८० हजार ६२३ पुरुष,२ लाख ८८ हजार ९७ स्त्री तर ३११ इतर मतदारांची नोंद झाल्याची माहिती महापालिका निवडणूक विभाग प्रशासनाकडून सांगण्यात आली.सन २०१७ मध्ये झालेल्या भिवंडी शहर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत चार लाख ७९ हजार २५३ एवढे मतदार नोंद होते.ज्यामध्ये आठ वर्षानंतर १ लाख ८९ हजार ७८० मतदारांची वाढ झाली आहे.आगामी होणाऱ्या भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस,समाजवादी पक्ष,भाजप, शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अन्य पक्षातील पदाधिकाऱ्यांनी बैठका व जनसंपर्क सुरू केला असुन कार्यकर्ते यांनी तर थेट मतदारांशी संपर्क करून प्रभागातील मतदारांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
—————
चौकट
भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक-2025 अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाचे आदेशानुसार एकूण 23 प्रभागांच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यांत आल्याची माहिती महापालिका निवडणूक अधिकारी अजित महाडीक यांनी दिली.प्रारुप मतदार याद्या संबंधित प्रभाग समिती कार्यालयामध्ये व महानगरपालिकेच्या मुख्यालयातील निवडणूक विभागामध्ये दि. 20/ ते दि.27/11/2025
पर्यंत कार्यालयीन वेळेत नागरिकांना पाहण्याकरीता उपलब्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदरच्या प्रारुप मतदार याद्या महानगरपालिकेच्या स्व.परशराम टावरे क्रीडा संकुल, धोबी तलाव, भिवंडी येथील निवडणूक कार्यालयामध्ये वरील मुदतीत कार्यालयीन वेळेत मा.राज्य निवडणूक आयोगाचे दि. 08/10/2025 रोजीचे पत्रातील निर्देशानुसार निश्चित करण्यांत आलेले शुल्क आकारुन (प्रति पृष्ठ रु. 2/-प्रमाणे) नागरिकांसाठी विक्रीकरीता उपलब्ध राहणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी अजित महाडीक यांनी दिली.
उक्त प्रारुप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दि. 20/11/2025 ते दि. 27/11/2025 या कालावधीमध्ये कार्यालयीन वेळेत संबंधित प्रभाग समिती कार्यालयामध्ये स्विकारल्या जातील. प्रारुप मतदार याद्यांच्या मतदारांच्या फोटी विरहीत प्रारुप मतदार याद्या महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ
bncmc.gov.in वर नागरिकांना पाहण्याकरीता व डाऊनलोड करण्याकरीता उपलब्ध राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

