भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहरात बेकायदेशीरपणे पिस्टल व जिवंत काडतूसे विक्री साठी चोरीची कार घेऊन आलेल्या इसमाना
ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपाआयुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या विशेष पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन गजाआड केले आहे.सदर आरोपी कडून सुमारे पाच लाख 54 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक गुन्हेगार पार्श्वभूमी असलेला व्यक्ती भिवंडी शहरात पिस्टल विक्री साठी येणार असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेचा पोलिसांना मिळताच त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार , सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी,पोलिस हवालदार शशीकांत यादव, सुनिल गिरे,शाबीर शेख,
अमोल देसाई, सचिन जाधव,नितीन बैसाने,रविंद्र साळुंके यांनी सापळा कारवाई करून सिद्धीक अहमद मतिउर रेहमान शेख (वय 24,साबेगांव,दिवा पुर्व,ठाणे) यास नारपोली पाईप लाईन भागातून ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ एक माऊजर पिस्टल,चार जिवंत काडतुसे आढळून आले.त्याच्या कडे अधिक कसून चौकशी केली असता त्याचा साथीदार बाबु खान उर्फ बंगाली (रा. दिवा, ठाणे) यांच्या मदतीने ठाणे बेलापुर रोड वरून इको कार चोरी केल्याची कबुली दिली.सिद्धीक अहमद मतिउर रेहमान शेख यांच्या ताब्यातून एकूण पाच लाख 54 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून पिस्टल प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे तर कार चोरी प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांनी दिली आहे.