भिवंडी ( प्रतिनिधी )सरत्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण स्तुत्य उपक्रम राबवतात तर काही जण मौजमजा करण्यासाठी मद्यपानाला महत्त्व देत असतात.दारू पिऊन वाहन चालवू नका असे आवाहन पोलिसांनी केले असताना सुध्दा शासकीय नियमांचे उल्लंघन केले जाते त्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पोलिसांना विशेष बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले होते.

तसेच मद्यपान करून वाहन चालकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार भिवंडी पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या 92 मद्यपींवर दंडात्मक धडक कारवाई करीत दणका दिला आहे.

भिवंडी शहर परिसरात 31 डिसेंबरच्या रात्री कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी भिवंडी पोलीस उपायुक्त मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस बंदोबस्त व गस्त सुरू होती दरम्यान अनेक जण मद्यपान करून वाहन चालवीत असतात त्यामुळे अपघातही होत असतात त्यामुळे या प्रकाराला पाय बंद करण्यासाठी भिवंडी वाहतूक पोलीस
विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शरद ओव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसां कडून रात्री वाहन चालकांसाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली यावेळी 92 मद्यपींवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.ज्यामध्ये भिवंडी नारपोली वाहतूक शाखेने सर्वाधिक 45 मद्यपीं वर कारवाई केली आहे.त्या खालोखाल राजनोली वाहतूक शाखेने 31 तर भिवंडी शहर वाहतूक शाखेने 16 मद्यपींवर कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली होती मात्र पोलिसांनी दंडात्मक कारवाई केल्यामुळे अनेकांनी शरणांगती पत्करत पोलिसांना सहकार्य केले.