भिवंडी ( प्रतिनिधी ) मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाण्या जवळील खारेगाव टोलनाक्याजवळ खाद्यतेलाच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणारा एक मोठा टँकर या पथकाने जप्त केला असून या कारवाईत तब्बल ४६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ही धडक ठाणे गुन्हे शाखा पोलीस आणि शिधावाटप विभागाच्या संयुक्त पथकाने केली आहे.लोकांची दिशाभूल करण्यासाठी संबंधित टँकरवर ‘ईडीबल ऑईल’ (खाद्यतेल) असे लिहिण्यात आले होते. या प्रकरणी मुख्य आरोपी चालकासह एकूण ८ जणांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हे शाखेच्या पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी ठाण्याजवळील खारेगाव टोलनाक्याच्या अगोदर, मुंब्रा वळण रस्त्याजवळ सापळा रचला असता,या ठिकाणी संशयास्पद टाटा कंपनीचा टँकर (क्रमांक MH-46-BB-7134) थांबवून त्याची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील द्रव पदार्थ आढळून आला. टँकर चालकाकडे या डिझेल सदृश पदार्थाची वाहतूक करण्याचा कोणताही परवाना, खरेदी बिल किंवा वैध कागदपत्रे नव्हती.त्यामुळे त्यांनी ठाणे उपनियंत्रक शिधावाटप विभाग शिधावाटप अधिकारी सुभाष रामनाथ डुंबरे व त्यांच्या पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करून संयुक्त तपासणीत टँकरच्या ५ कप्प्यांमध्ये एकूण २५,००० लिटर बेकायदेशीर डिझेल सदृश पदार्थ आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये २४ लाख ५० हजार रुपये किमतीच्या २५,००० लिटर डिझेल सदृश पेट्रोलियम पदार्थाचा आणि २२ लाख रुपये किमतीच्या टाटा टँकरचा समावेश आहे.रासायनिक चाचणीसाठी नमुने गोळा केले असून, टँकर व इतर मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.या प्रकरणी मुख्य आरोपी चालक धर्मेंद्रकुमार श्यामलाल पटेल (वय ३७ वर्षे, रा. वाशी, नवी मुंबई) याला अटक करण्यात आली आहे. तसेच टँकर मालक रितेश अभय नारायण सिंग (रा. दिवा, ठाणे) यांच्यासह पालघर व सुरत येथील रोशन शिरोडकर, नितीन कोली, राजू पंडित, दीपक पवार, सागर पाटील आणि अनिल सुरत या इतर ७ साथीदारांची नावे निष्पन्न झाली आहेत.शिधावाटप अधिकारी सुभाष डुंबरे यांच्या फिर्यादीवरून सर्व आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५, मोटार स्पीरीट अँड हायस्पीड डिझेल ऑर्डर २००५ आणि बायोडिझेल धोरण २०२१ च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस निरीक्षक अशोक उतेकर या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

