भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील नव्या अत्याधुनिक बस स्थानकाच्या उभारणी कामास १४ कोटी रुपये खर्चाच्या बांधकामास राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर ते काम सुरू होणार आहे. त्यामुळे
प्रवासी नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये व त्रास होऊ नये यासाठी पर्यायी तात्पुरत्या बस स्थानकाच्या उभारणीची मागणी भिवंडी चे आमदार महेश चौगुले यांनी केली होती.त्यास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुंबई प्रदेश कार्यकारी अभियंता कार्यालयाने मंजुरी दिली असून त्यासाठी ७२ लाख ८४ हजार ८०८ रुपयांची ई-निविदा प्रसिद्ध केली असुन लवकरच काम सुरू होणार असल्याची माहिती आ.चौगुले यांनी दिली.

भिवंडी शहरातील एसटी बस स्थानक हे पुरातन झाल्यामुळे या बसस्थानकाची इमारत धोकादायक जागी आहे त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे महापालिका प्रशासनाने या इमारतीला धोकादायक नोटीसही लावली आहे त्यामुळे
भिवंडी शहराला आधुनिक व सुसज्ज बस स्थानक मिळावे यासाठी आमदार महेश चौगुले यांनी गेल्या सातत्याने पाठपुरावा केला आहे. विधानसभेत प्रश्न उपस्थित करणे, परिवहन मंत्र्यांच्या बैठका घेणे तसेच महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून या प्रकल्पाला गती देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.त्यामुळे राज्य शासनाने नवीन बस स्थानक बांधकाम इमारतीस परवानगी दिली आहे.पावसाळा तोंडावर असताना कोणत्याही प्रकारची दुर्घटना बस स्थानकामध्ये होऊ नये यासाठी तसेच बस स्थानकातून एस.टी.बस सेवा आणि प्रवाशांची वाहतूक व्यवस्था अखंडित सुरू राहावी यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचे पर्यायी बस स्थानक उभारण्याची मागणी आ.चौगुले यांनी शासनाकडे केली होती त्यास मंजुरी मिळाली असुन भिवंडी एसटी बस स्थानकात आता
तात्पुरत्या स्वरूपाचे पर्यायी बस स्थानक उभारण्यात
येणार आहे.त्यामुळे दररोज हजारो प्रवाशांना होणारी गैरसोय टळणार असून भिवंडीकरांना नियमित एस.टी. सेवा उपलब्ध राहणार आहे.भिवंडी शहराच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा असून नवीन बस स्थानक पूर्ण झाल्यानंतर शहराला आधुनिक सुविधा,प्रशस्त प्रवासी व्यवस्था आणि अधिक सक्षम वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे. यासाठी शासन, परिवहन विभाग व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आमदार महेश चौगुले यांनी आभार मानले आहेत.

